ठाकरे कुटुंबाची सुरक्षा ही केंद्र सरकारची जबाबदारी, संजय राऊत यांनी सुनावलं

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आणि लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मातोश्री निवासस्थानाजवळ मोठा घातपात होणार असल्याचा निनावी फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला. यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. यावर आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून ठाकरे कुटुंबाची सुरक्षा ही केंद्राची जबाबदारी असल्याचे राऊत म्हणाले.

सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांना महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनबाबत विचारले. यावर राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, महाराष्ट्रातील डाऊटफूल सरकारची नाही. हे सुडाने पेटलेले सरकार आहे, त्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. ज्या प्रकारे ठाकरे कुटुंबाचे आणि शिवसेना नेत्यांचे संरक्षण काढून घेतले, त्यामुळे उद्या भविष्यात काही घडले तर ही केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृहखात्याची जबाबदारी असेल, असे राऊत म्हणाले.

अर्धवट उपमुख्यमंत्र्यांनी आधी स्वत:ची खुर्ची सांभाळावी, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला

उद्या महापत्रकार परिषद

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेने संदर्भात दिलेल्या निकालाची चिरफाड करणारी उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद उद्या वरळीतील डोम सभागृहात होणार अससल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. या पत्रकार परिषदेला काही कायदेपंडीत उपस्थित असणार असून त्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. देशभरातील पत्रकारांना आम्ही आमंत्रित केले असून त्यांच्यासमोर राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर खुली चर्चा होईल, असेही राऊत यांनी सांगितले.