अजित पवारांना बारामतीतून लढण्यात रस नाही; संजय राऊत यांनी सांगितलं कारण

लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीची जनता एकनिष्ठपणे शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहिली आणि सुप्रिया सुळे विजयी झाल्या. तर सुनेत्रा पवार यांना मानहानीकारण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता अजित पवार यांनी बारामतीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. बारामतीतून पुन्हा विधानसभेची निवडणूक लढण्यात रस नसल्याचे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या या निर्णयामागील कारण सांगितले आहे.

अजित पवार यांनी बारामतीतून लढणार नसल्याचे संकेत दिले आहेत. यावर संजय राऊत माध्यम प्रतिनिधीशीं बोलताना रोखठोक भाष्य केले. अजित पवारांना बारामतीमध्ये रस राहिला नाही, कारण बारामतीकरांनी लोकसभेमध्ये त्यांना पिळून काढले आहे. आता ते कर्जत-जामखेडमधून पुतण्याविरोधात लढण्याची शक्यता आहे. कधी बहिणीविरुद्ध, तर कधी पुतण्याविरुद्ध. ते घरातल्या घरातच कुस्ती करणार आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्रातील दरोडेखोरांचं सरकार हटवण्यासाठी महाविकास आघाडी रणशिंग फुंकणार! – संजय राऊत

काय म्हणाले अजित पवार?

पुण्यात अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी जय पवार यांना बारामतीतून उमेदवारी दिली जाणार का? असे विचारले असता बारामतीत मी सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे. मला तरी आता तिथून पुन्हा निवडणूक लढण्यात रस नाही. शेवटी लोकशाही आहे. लोक म्हणतील त्याप्रमाणे आमच्या पक्षाची संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.