कुबड्यांचं सरकार ‘वन नेशन वन इलेक्शन’चं ढोल वाजवतंय, पण सिनेट निवडणूक घेण्याची हिंमत नाही! – संजय राऊत

मुंबई विद्यापीठाची दोन दिवसांवर आलेली सिनेट निवडणूक पुन्हा एकदा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत मिंधे-भाजप सरकारवर हल्ला चढवला. केंद्रातील कुबड्यांचे सरकार वन नेशन वन इलेक्शनचे ढोल वाजवत आहे, पण इकडे डरपोक मिंधे सरकार सिनेट निवडणूक घेण्यासही घाबरतंय, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

शनिवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सिनेट निवडणूक दोन दिवसांवर आली होती आणि त्याची तयारीही झाली होती. शिवसेना, युवासेनेचे कार्यकर्ते सर्वच्या सर्व जागा जिंकणार ही बातमी येतात मिंधे सरकार घाबरले आणि निवडणूकच रद्द केली. जिथे पैशाची मस्ती चालती तिथेच हे निवडणुकीला सामोरे जातात. मात्र हा सुशिक्षित तरुण वर्ग असून इथे पदवीधर मतदान करतो. मुंबई विद्यापीठ जागतिक किर्तीचे असून त्याला दिशादर्शकाचे काम हा तरुणवर्ग करतो. मात्र ही निवडणूक आपण हरतोय असे लक्षात येताच डरपोक शिंदे सरकारने दुसऱ्यांदा ही निवडणूक रद्द केली.

नरेंद्र मोदी लोकशाहीवर मोठी-मोठी भाषणं करतात. यात निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सरकारच्या बोळ्याने दूध पितायत का? असा सवाल राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, केंद्रातील कुबड्यांचे सरकार ‘एक देश एक निवडणूक’ या योजनेचे ढोल वाजवत आहे, पण सिनेटची निवडणूक, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही.

मिंध्यांची टरकली, दुसऱ्यांदा निर्णय फिरवला, विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती; अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली

ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर, ईव्हीएमचा गैरवापर करून आणि पोलीस यंत्रणेचा वापर करून जिंकू शकतात अशाच निवडणुकीला सरकार सामोरे जात आहे. जिथे लोकांची मतं विकत घेता येत नाहीत, ईव्हीएम नाही तिथे निवडणूक घेण्याची हिंमत सरकारमध्ये नाही हे पुन्हा दिसून आले. ही निवडणूक रद्द करून सरकारने पदवीधर वर्गाचा रोष ओढवून घेतला आहे, असेही राऊत म्हणाले.

पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच

पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल. आम्ही नाही तर राज्याची जनता मुख्यमंत्री निवडेल. राज्याची जनता यावेळी मुख्यमंत्री निवडण्यासाठी महाविकास आघाडीला मत देईल. लक्ष्मण हाके म्हणतात, राज्यात बसलेला मुख्यमंत्री भ्रष्ट आणि गुंड आहे. त्यालाच हटवून आम्हाला स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री बसवायचा आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

फडणवीस मनाने हरले आहेत

देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीत भाजप शंभरहून अधिक जागा जिंकेल असे म्हणत आहेत. मात्र ते शतक ठोकणार की पहिल्या चेंडूवर बाद होणार हे काळ सांगेल. फडणवीस पहिल्यापासूनच मैदानाबाहेर फेकले गेलेले असून ते मनानेही हरले आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सेमींकडक्टर प्रकल्प फसवणुकीचा प्रकार

सेमीकंडक्टर प्रकल्प हा फसवणुकीचा प्रकार आहे. जिथे 5-6 लोक काम करतात तिथे सरकार 500-600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. या मार्गाने भ्रष्टाचार करण्याचा, राज्यातील जनतेची दिशाभूल करून फसवणूक करण्याचा आणि आपापल्या लोकांना पैसे वाटण्याचा प्रकार आहे, असेही राऊत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.