पंतप्रधान होण्याचं फडणवीसांचं स्वप्न होतं; मोदी-शहांनी पंख छाटून त्यांना उपमुख्यमंत्री केलं! – संजय राऊत

‘मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान होण्याची स्वप्न पडू लागले. मोदी आणि योगींना हटवून पंतप्रधान होणार हे त्यांच्या डोक्यात सुरू होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ते सांगितले असून आमचे राजकारण खोट्याच्या डोलाऱ्यावर उभे नाही. मात्र दिल्लीत येऊन पंतप्रधान होण्याच्या फडणवीसांच्या स्वप्नांचे पंख मोदी-शहांनी कापले आणि त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केले’, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी जी चर्चा झाली त्यानुसार ते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवून दिल्लीत जाणार होते. दिल्लीत अर्थमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान होण्याचे त्यांचे मोठे स्वप्न होते. अर्थात हे स्वप्न बाळगायला काही हरकत नाही. महाराष्ट्राच्या नेत्याला असे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतो.’

‘देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत येण्याचे स्वप्न मोदी-शहांना आवडले नाही. म्हणून त्यांच्या स्वप्नांचे पंख छाटून त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केले असे दिसते. इतके मोठे स्वप्न फडणवीस पाहू लागल्याने मोदी-शहांनी निर्णय घेतला आणि त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाती काम करायला लावले. याला मोदी-शहांची राजनीती म्हणतात’, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळला असल्याचे विचारले असता संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही. प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही. हा मानवी स्वभाव असून त्या स्वभावापासून फडणवीसही वेगळे नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जे सांगितले तेच 16 आणे, 100 टक्के सत्य आहे.’

इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचे अनेक चेहरे

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही राऊत यांनी भाष्य केले. इंडिया आघाडी 300हून अधिक जागा जिंकेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदाचे अनेक चेहरे आहेत. इंडिया आघाडीत काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असून इतरही घटकपक्ष आपापल्या राज्यात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न नाही. मात्र भाजप गेल्या 10 वर्षापासून एकच चेहरा घासूनपुसून पुढे आणत असून यंदा लोकं तो स्वीकारणार नाही. मोदी आणि त्यांचा पक्ष पराभूत होणार आहे. इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचे अनेक चेहरे असून उद्धव ठाकरेही त्यापैकी एक आहेत. आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याचे नाव घेतले, हा गुन्हा आहे का? जर देशाचे नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्राला मिळाले तर त्याचे नक्कीच स्वागत करू. पण आम्ही पंतप्रधानपदावर चर्चा करत नाही. राहुल गांधी यांनी देशाचे नेतृत्व करावे ही आम्ही वारंवार सांगत आलो आहोत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.