“कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि…”, मिंधे-अजित पवार गटाबाबत संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने ‘तुतारी’ फुंकली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला दिलेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्षचिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण झाले. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मिंधे आणि अजित पवार गटाला दिलेल्या प्रस्तावाचाही गौप्यस्फोट केला.

महाराष्ट्राची 11 कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत चांगले आणि ऐतिहासिक चिन्ह मिळाले आहे. शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे लोकांमध्ये आधीच उत्साहाचे वातावरण आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. त्यांनी अजित पवार आणि मिंधे गटापुढे प्रस्ताव ठेवला की तुमचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील. कारण धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळाला असला तरी लोकं तुम्हाला मतदान करणार नाहीत. घड्याळ जरी तुम्हाला मिळाले असेल, अर्थात चोरून दिले असले तरी लोकं तुम्हाला मतदान करणार नाहीत. त्यामुळे कमळ चिन्हावर लढा. कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे.पी. नड्डा यांना दिला. हे जर खोटे असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

दोन्ही गटांची अशी अवस्था आहे. दोघांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने चिन्ह चोरले असले तरी त्यांना त्यावर निवडणूक लढवण्याची हिम्मत नाही आणि भाजपालासुद्धा फुटलेल्या दोन्ही गटांना त्यांच्या चिन्हावर निवडवणुका लढू देण्याचे धाडस नाही, असा घणाघात राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात खरी शिवसेना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची असून आम्ही मशाल, तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी घेऊन लढेल. काँग्रेस पक्षाचा हात आहेत. त्यामुळे भविष्यातील लढाई अत्यंत रोमांचक होणार आहे, असेही राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही राऊत यांनी भाष्य केले. चर्चा जवळपास संपलेली असून 27 तारखेला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकत्र बसणार आहे. लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागतील. त्याआधी आमचे जागावाटप जाहीर होईल. संपूर्ण देशात जागावाटप अत्यंत सुरळीत कुठे सुरू असेल तर ते महाराष्ट्रात असल्याचेही राऊत म्हणाले. हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव करणे हेच आमचे ध्येय असल्याचेही ते म्हणाले.