“तातडीने निर्णय घ्यावा व असंख्य कुटुंबास…”, खासदार संजय राऊत यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवरून आणि मुंबईसह महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. ऑनलाईन जुगारामुळे हजारो मराठी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत व कित्येक तरुणांनी जुगारात सर्वस्व गमावल्याने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत, असे राऊत यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले असून गृहमंत्री म्हणून आपण तातडीने निर्णय घ्यावा व असंख्य कुटुंबास देशोधडीस लागण्यापासून वाचवावे अशी मागणी पत्रद्वारे केली आहे.

राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनात घुसून गोळीबार करीत आहेत, तर कुठे लोकप्रतिनिधींवर गोळ्या चालवून हत्या घडवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशातच मुंबईसह महाराष्ट्रात ‘ऑनलाईन लॉटरी’च्या रूपाने जुगाराचे नवे अड्डे बेकायदेशीरपणे चालविले जात आहेत. या जुगारामुळे रोज हजारो मराठी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत व कित्येक तरुणांनी जुगारात सर्वस्व गमावल्याने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार सुरू आहे व त्यामुळेच अशा बेकायदेशीर जुगारी अड्यांना सरकार पाठीशी घालत आहे काय? लॉटरी रेग्युलेशन अॅक्ट 2010 चे संपूर्ण उल्लंघन करून ही ऑनलाईन लॉटरी महाराष्ट्रात सुरू आहे व त्यास जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या जुगाराच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जाऊ नये यासाठी महिन्याला साधारण 100 कोटींचा हप्ता वित्त विभाग, गृहविभागापर्यंत म्हणजे सरकारपर्यंत पोहोचवला जाते. वित्त विभाग आणि गृहविभागाशी याबाबत मध्यस्थी करण्याचे काम गुजरात निवासी मंगलभाई नावाचा दलाल करतो. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, संपूर्ण महाराष्ट्रात या बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी जुगाराची उलाढाल सालाना 30 हजार कोटींपेक्षा जास्त आहे.

मुंबईसह महाराष्ट्राच्या कित्येक जिल्हयांत या ऑनलाईन लॉटरी जुगाराचे 2500 पेक्षा जास्त अड्डे आहेत. या अड्ड्यांवर रोज हजारो लोकांची शेकडो कोटींची आर्थिक फसवणूक होते. महिन्याचे पगार घरी न जाता शेकडो नोकरदार लोक याच अड्यांवर उडवत असल्याचे समजले. त्यामुळे असंख्य कुटुंबातील गृहणी, मुलाबाळांची अवस्था बिकट झाली आहे.

2018 साली केंद्र सरकारने देशभरातील अशा ऑनलाईन लॉटरी जुगाराबाबत सर्वच राज्यांना अशा बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ऑनलाईन लॉटरीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्रातील या ऑनलाईन लॉटरी जुगाराबाबत सीबीआय चौकशीची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती, पण तरीही हे जुगाराचे अड्डे सुरूच आहेत व त्यानंतर हप्त्यांचे आकडे मात्र वाढले.

महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक तसेच कायदा-सुव्यवस्थेशी निगडित असा हा विषय आहे. अनेक सुशिक्षित तरुणांचे जीवन, त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन लॉटरी जुगारावर तत्काळ बंदी आणावी. महाराष्ट्राची आर्थिक लूट आणि मराठी जणांची फसवणूक थांबवावी. या निमित्ताने सुरू असलेल्या कोट्यवधींच्या लाचखोरीस आळा घालावा, अशी मी आपणास विनंती करीत आहे, असे पत्र खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.