तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठीच बनवली जाते; ‘मविआ’च्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न! – संजय राऊत

राज्यातील विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी होऊ शकतात. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक तयारीला लागलेले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती आणि प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी ‘परिवर्तन महाशक्ती आघाडी’ची घोषणा केली आहे. ही तिसरी आघाडी कायम सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठी आणि विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्यासाठी स्थापन केली जाते, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

शुक्रवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींनी तिसऱ्या आघाडीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, तिसरी आघाडी ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते. केंद्रात आणि राज्यात जे सत्तेत असताना ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत इतिहास आणि अनुभव हेच सांगतो. विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत आहे, पण महाविकास आघाडीची मतं थोडीफार कमी करण्यासाठी नवीन आघाडी स्थापन करायची आणि त्यासाठी पैशांचा, पदांचा वापर करायचा असे धोरण दिसत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात असून विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. मात्र याआधी केलेल्या उद्घाटनांचे काय झाले? असे विचारले असता संजय राऊत यांनी भाजपकडे बोट दाखवले. हा प्रश्न भाजपच्या प्रमुख नेत्यांनाच विचारायला हवा. मोदी येतात आणि जातात, आपण नक्की कसले उद्घाटन केले हे देखील त्यांना माहिती नसते. भाजपने घेतलेल्या भूमिकांमुळे महाराष्ट्र डळमळीत, अस्थिर झालेला असून औद्योगिकदृष्ट्या कमजोर झालेला आहे. याचे कारण मोदी येतात आणि फक्त फिती कापून जातात, असे राऊत म्हणाले.

शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा; 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा

आजही एक उद्योग गुजरातला गेला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती गंभीर आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी इथे उद्घाटन करण्याऐवजी महाराष्ट्रातला उद्योग जो बाहेर नेताय तो महाराष्ट्रात थांबवण्यासाटी काही करता येईल का त्या संदर्भात निर्णय घ्यावा. जम्मू-कश्मीर दौऱ्यावर असताना मोदींनी पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली. कारण तिथल्या जनतेची तशी भावना आहे. मग पूर्ण राज्याचा दर्जा काढलाच का? असा सवाल करत याच पद्धतीने महाराष्ट्रातील जो उद्योग गुजरातला नेलेला आहे तो परत महाराष्ट्राला द्यावा, अशी मागणी राऊत यांनी केली.

आपटे, कोतवालला वाचवायचं काम शिंदेंनी केले

दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेस एक महिना आठ दिवस उलटून गेले तरी शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल व सचिव तुषार आपटे अजूनही पोलिसांना सापडेनात. यावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला. आपटे आणि कोतवालला एकनाथ शिंदे यांचे संरक्षण असून ते दोघेही त्यांच्या चिरंजीवाच्या मतदारसंघातील आहेत. आपटे आणि कोतवाल यांचे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद असून आपटे आणि कोतवालला वाचवायचे काम शिंदेंनी केलेले आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची गाढ निद्रा; महिना उलटला, आपटे आणि कोतवाल काही सापडेनात!