ईडीने मुख्यमंत्री शिंदेंवर कठोर कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोमवारी सकाळी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी ही मागणी केली.

‘गुन्हेगारीतून मिळालेला पैसा कुणी स्वीकारलेला असेल तर त्या मनी लाँड्रिंग प्रकरणात संबंधितांना अटक व्हायला हवी, ही त्या कायद्याची स्पष्ट व्याख्या आहे. भाजपचे आमदार हे गुन्ह्यामुळे तुरुंगात आहेत. त्यांचंच विधान आहे की माझे कोट्यवधी रुपये हे शिंदेंकडे आहेत, मी दिलेले आहेत. हा आकडा 100 कोटीच्यावर आहे. गेल्या 10 वर्षात ही रक्कम आहे. प्रश्न आहे का? याचा शोध ईडीने घेतला पाहिजे. जर हा गुन्हेगारीतून आलेला पैसा एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला असेल तर PMLA कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे’, अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली.

शिंदेंच्याविरोधात आपल्याकडे काही पुरावे आहेत का या प्रश्नाच्या उत्तरावेळी त्यांनी या कायद्यात स्टेटमेंट हाच पुरावा असं म्हणत याआधी आपल्यासह देशातील अन्य बड्या नेत्यांवर झालेल्या कारवायांची उदाहरणे दिली. ‘या कायद्यात पुरावा लागात नाही, तर स्टेटमेंट (विधान) वरूनच आम्हाला अटक झाली होती. स्टेटमेंट हाच पुरावा मानला गेला होता. PMLA कायद्यात स्टेटमेंट हाच पुरावा म्हणून वापरला जातो. असं आहे तर गणपत गायकवाड हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि कोट्यवधी रुपये त्यांच्याकडे दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे, हाच पुरावा आहे आणि हा पुरावा मग ईडी, सीबीआय, गृहमंत्रालय कुठे आहे? का ते फक्त विरोधकांसाठी आहे’, असा सणसणीत टोला हाणला.

‘यात महत्त्वाचा एक भाग म्हणजे एफआयआर झाल्याशिवाय ईडी यात पडत नाही. या गुन्ह्यात गणपत गायकवाड यांच्यावर एफआयआर झालेली आहे. त्याच एफआयआरचा वापर करून ईडी गुन्हा दाखल करू शकते’, असं संजय राऊत म्हणाले.