बोलवता धनी कोण हे माहिती नसेल तर फडणवीस यांनी राजीनामा द्यावा! – संजय राऊत

मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतील महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण आहे. 10 टक्के आरक्षण वाढवले, विधिमंडळाने कायदाही पास केला, पण हे आरक्षण टिकेल का? अशा प्रकारची भूमिका जरांगे-पाटील यांची आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्यांना आश्वस्त करावे. जर हे 10 टक्क्यांचे आरक्षण टिकले नाही तर आम्ही राजीनामे देऊ असे वचन त्यांनी द्यावे, तरच हा प्रश्न सुटेल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

जरांगे पाटील यांनी काल मुंबईत येण्याची जी भूमिका घेतली ती त्यांची किंवा त्यांच्या समाजाची भूमिका आहे. यावर फडणवीस यांनी प्रश्न केलाय की यामागचा बोलवता धनी कोण आहे? ते स्वत: गृहमंत्री आहेत. जर त्यांना यामागचा बोलवता धनी कोण आहे हे माहिती नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊत यांनी केली. हे सगळे घडवणारे कोण आहे? तुमच्या सरकारचा हिस्सा आहेत का? तुमच्या आजूबाजूला बसले आहेत का? ज्यांना महाराष्ट्र अस्थिर अस्वस्थ करून काही वेगळे राजकारण करायचे आहे. गृहमंत्री म्हणून तुम्हाला माहिती नसेल तर हे पद कशासाठी? असा सवालही राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, जरांगे पाटलांचे फोन नक्कीच टॅप केले असणार. त्यासाठीच रश्मी शुक्ला यांना बसलले असून त्या याबाबतीत अनुभवी आहेत. कोण कोणाला फोन करतंय, कोण कोणाशी बोलतंय, कोण कोणाला सपोर्ट करतंय हे त्यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार. त्यामुळे गृहमंत्र्यांनी अनुभवी पोलीस महासंचालकांशी चर्चा केली पाहिजे. यामागचा बोलवता धनी कोण आहे? कोण कोणाला फोन करतंय? फोन करणारे आपल्याच सरकारमध्ये आहेत का? ते काही काड्या लावत आहेत का? ते महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत का? याची गृहमंत्र्यांकडे माहिती नसेल तर हे राज्याचे दुर्दैव असल्याचेही राऊत म्हणाले.

जरागं पाटील हे साधे, गावातील, ग्रामिण भागातील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषेकडे लक्ष न देता, त्यांची भावना समजून घ्या. ते काही व्हाईट कॉलर नेते नाहीत. भाजपने आपल्या सुशिक्षित, कडक इस्त्रीतील नेत्यांकडे लक्ष द्यावे. ते एकमेकांना संपवण्याची, खतम करण्याची भाषा वापरत आहेत. पोलिसांसंदर्भात बोलत आहेत. राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या एका टोळीने बिघडवले आहेत. महाराष्ट्र हे अत्यंत सलोख्याने वागणारे, सुसंस्कृत आणि संस्कारी राज्य, पण फडणवीस यांच्याकडे सूत्र गेल्यापासून महाराष्ट्राची अवस्था खराब झाली आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असून पंतप्रधान मोदी द्वारकेत स्कुबा डायव्हिंग करताहेत. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, भाजपच्या प्रचाराचा तोच मुद्दा असावा, कारण विकासाचा मुद्दा कुठेय? अजित पवारांनी जे पत्र लिहिलेले आहे, त्यात ते म्हणतात की विकासासाठी मोदींकडे गेलो. आता बहुतेक फडणवीस, पवार, शिंदे यांनाही समुद्रात डुबकी मारून स्कुबा डायव्हिंग करावी लागेल. कारण ते मोदींचे फॉलोअर असून मोदी जे करतात ते त्यांना करावेच लागते. त्यामुळे उडी मारण्यासाठी समुद्र, नदी शोधून ठेवावी. अजित पवार कदाचित धरणात उडी मारतील, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची उद्या बैठक पार पडत आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, देशभरात इंडिया आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ पूर्ण झाला आहे. अनेक ठिकाणी जागावाटपही जाहीर झाले. महाराष्ट्रात उद्या दुपारनंतर बैठक सुरू होईल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी असे आम्ही एकत्र बसून 27 आणि 28 फेब्रुवारी या दोन दिवसात अंतिम मसुदा तयार करू. ज्यांनी ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्यावर चर्चा होणार नाही. ज्या जागा भाजपकडे आहेत त्याचे वाटप होईल आणि त्यानुसारच सगळे ठरतेय.