एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अपमानित करणं हे लोकशाहीला शोभत नाही! संजय राऊतांनी सुनावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. बैठकीदरम्यान ममता बॅनर्जी बोलत असतानाच त्यांचा माईक बंद करण्यात आला होता. यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे अपमानित करणे हे लोकशाहीला शोभत नाही, अशा शब्दांत राऊत यांनी सुनावले.

ममताजींना बोलू दिले नाही, आपले म्हणणे मांडू दिले नाही, त्यांचा माईक बंद केला. पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अपमानित करणे हे लोकशाहीला शोभत नाही. लोकसभा असेल, राज्यसभा असेल आमचे माईक बंद केले जातात. मात्र पंतप्रधानांसमोर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्यास रोखणे हे योग्य नाही, असे राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री गेले अन् दाढीवर हात फिरवून आले

राज्यात जीएसटी परताव्यासह अनेक मुद्दे आहेत. यासाठी केंद्राने मदत केली पाहिजे. केंद्र सरकार खुर्ची वाचवण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहारला भरभरुन देतंय. हा अधिकार सर्व राज्यांना आहे. हा पैसा केंद्र सरकारचा नाही, मोदीजींच्या किंवा शहांच्या गुजरातमधून येत नाही. हा देशातील जनतेचा पैसा आहे. टॅक्स व जीएसटी कलेक्शनमधून आलेला पैसा आहे, असे सांगत महाराष्ट्राला काय मिळालं? असा सवालही राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री गेले अन् दाढीवर हात फिरवून आले, असा टोलाही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला आहे.

अजित पवार-अमित शाह छुप्या बैठकीवरुन टोला

महाराष्ट्राबाबत कपट कधीपासून सुरु होतं हे हळूहळू कळू लागलंय. महाराष्ट्राला रंगमंच किंवा नाटकाची फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राला रंगमंचाने अनेक मोठे मोठे कलाकार दिले. महाराष्ट्राला नाट्यसृष्टीची परंपरा आहे. या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेले दिसतंय. यांना सुद्धा रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करुन घेतलं पाहिजे. कारण इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात, इतक्या उत्तम पद्धतीने ते आपले चेहरे बदलतात. इतक्या उत्तम पद्धतीने राजकारणातील फिरत्या रंगमंचावर काम करतात. अजित पवार हे एखाद्या रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या घालून, खोट्या पिळदार मिशा लावून दिल्लीत अमित शहांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईटखाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते आणि हे दोघं बोलतायत हे लोक त्यांना ओळखत नव्हते. म्हणजे हे किती हुबेहूब मेकअप करत होते. म्हणजे फार मोठी गोष्ट आहे या राजकारणातल्या कलाकारांनी मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीचं फार मोठं नुकसान केलंय.

एकनाथ शिंदे अहमद पटेलांनाही वेश बदलून भेटायचे

आता एकनाथ शिंदे वगैरे हे लोक खोट्या कथा लिहून सिनेमा काढतायत. त्यांनी स्वतःवर जे नाटक रचलं होतं त्याच्यावर त्यांना एखादं नाटक किंवा सिनेमा लिहिता येत नसेल तर मी उत्तम लेखक आहे. मी लिहितो, मला प्रसंग त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहेत. एकनाथ शिंदे आतापासून वेश बदलून जात नव्हते. तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अहमद पटेलांना वेश बदलून भेटायला जात होते. जेव्हा भाजपचं राज्य नव्हतं. केंद्रात काँग्रेसचं राज्य होतं तेव्हाही ते अहमद पटेलांना भेटायला कशा प्रकारे जात होते, याबाबत पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकतील. अजित पवार हे तर उत्तमच नटवर्य आहेत, दिसतंच आहे ते.

विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचं नाव समोर येईल

एकनाथ शिंदे हे भाजप आणि अजित पवारांच्या युतीतील इतके मोठे नेते आहेत की ते 288 जागाही जिंकू शकतात. राज्याचं मुख्यमंत्रीपद कुणाला मिळतंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळेल. हे पद एकनाथ शिंदे यांना 100 टक्के मिळणार नाही. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, तर वेगळंच नाव समोर येईल.

लाडकी बहीण योजनेवरुन शिंदेवर शरसंधान

शिंदेंच्या पोटात काय आणि ओठात काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे शिंदेंकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे. या आठ लाख कोटींच्या कर्जातून हे आपल्या लाडक्या बहिणींचा
उद्धार कसा करणार, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कारण अर्थ खात्यानेही याच्यावर आक्षेप घेतला आहे.