फेक नरेटिव्ह सेट करण्याचा कारखाना BJP आणि RSSचा; संजय राऊत यांचा जोरदार घणाघात

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने सपाटून मार खाल्ला. आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीला धूळ चारण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. निवडणूक तोंडावर आल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. लोकसभा निवडणुकीत नरेटिव्हचा मुद्दा गाजला होता. याच मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि आरएसएसचा समाचार घेतला आहे. फेक नरेटिव्ह सेट करण्याचा जो कारखाना आहे तो भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसचा आहे, असा जोरदार घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत हे सध्या धुळे दौऱ्यावर आहेत.

कोणताही फेक नरेटिव्ह कोणीही सेट केलेला नाही. फेक नरेटिव्ह सेट करण्याचा जो कारखाना आहे तो भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसचा आहे. आरएसएस खरोखरच निवडणुकीच्या मैदानात उतर असेल तर ते कोणतातरी वेगळा अजून एक फेक नरेटिव्ह सेट करतील. आरएसएस ही एक सांस्कृतीक संघटना आहे, राजकीय नाही, असं आतापर्यंत ऐकत होतो. या संघटनेचे सरसंघचालक सध्या मोहनराव भागवत आहेत. आमचा राजकारणाशी संबंध नाही, अशी अनेक विधानं त्यांची आहेत. आम्ही सांस्कृतीक संघटन आहोत, आम्ही सामाजिक कार्य करतो, असे सांगतात. पण जर अधिकृतपणे त्यांनी जाहीर केलं असेल की आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत, तर पाहावं लागेल. मी काही वाचलं नाही किंवा ऐकलं नाही. सूत्रं वैगरे काही नसतं. सूत्रं म्हणजे फेक नरेटिव्ह असतं, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.

अनिल गोटे या भागातले महत्त्वाचे नेते आहेत. या भागात विधानसभेचं त्यांनी अनेक काळ प्रतिनिधित्व केलेलं आहे. अनेक चळवळी त्यांनी केलेल्या आहेत. गेले काही काळ ते आजारी होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते इस्पितळात आहेत, असं मला सांगण्यात आलं. पण मी चौकशी करतोय असा त्यांना निरोप गेला आणि ते आज मला भेटालयाला आले. भेटीत राजकीय चर्चा नक्कीच होते. इथे ते निवडणूक लढणार आहेत. त्यांच्याकडून या भागातली माहिती मी समजून घेतली. कारण ते या भागातले एक्सपर्ट आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.