लाडक्या राजाची काळजी न घेणारे लाडक्या बहिणीच्या गोष्टी करत आहेत, संजय राऊत यांची टीका

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. आमच्या लाडक्या राजाची काळीजी न घेणारे लाडक्या बहिणीच्या गोष्टी करत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात तिथे माती होते असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हा आमच्या हृदयावर आघात आहे आणि तो कधीच भरुन निघणार नाही. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जातं आणि चालवलं जातं. पण पंतप्रधान मोदी यांनी घाईघाईने या पुतळ्याचे अनावरण केलं. लोकसभा निवडणुकीच्या मतांचा विचार करता, इतक्या घाईने उद्घाटन करण्यात आलं की त्यांना फडणवीस, मिंधे आणि अजित पवार सरकारला सांगण्यात आलं होतं की या पुतळ्याचे अनावरण करू नका. तरीही हे घाईघाईत या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. त्या पुतळ्याच्या बांधकामाविषयी, शिल्पकलेविषयी अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला होता, त्यात इंद्रजित सावंत होते. संभाजीराजे भोसले यांनीही त्यावर आक्षेप नोंदवला होता. तरीही त्या पुतळ्याचे अनावरण झाले. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान कधी झाला नव्हता. औरंगजेब आणि मुघलांनी आमच्यावर अनेक हल्ले केले. पण छत्रपतींचा असा अपमान मोगल राजे आणि त्यांच्या सरदारांनीही केली नव्हता. छत्रपती स्वाभिमानाने आग्र्यातून सुटून आले. पण आपल्याच राज्यात कोसळून पडण्याची त्यांच्यावर वेळ आली. याला सर्वस्वी पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम केलं, एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतल्या ठेकेदाराला हे काम दिलं. त्यात यांना किती कमिशन मिळालं याचा शोध घ्यावा लागेल. ठेकेदार, शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याचे समोर आले आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्यांनी काहीही कारणं दिली तरी महाराष्ट्र आज दुःखी आहे. महाराष्ट्राच्या छातीत आरपार जी वेदना झाली आहे, त्याची भरपाई कधीच कोणी करू शकत नाही. महाराजांच्या पुतळ्याचे जे तुकडे झालेल आम्ही पाहिले, महाराष्ट्रावर असे काही पाहण्याची वेळ येईल हे आम्हाला कधी वाटलं नव्हतं असे संजय राऊत म्हणाले.

राजकीय हेतूने पुतळा बनवला

हे सरकार अजूनही हसतंय. सरकारच्या चेहऱ्यावर मला एकही वेदना दिसत नाही. सरकार म्हणतंय की समुद्रावर जोरदार वारा वाहत होता. हे कुणाला मुर्ख बनवत आहेत? समुद्रावर, किल्ल्यावर वारा असणारच. 1933 साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला होता. तो अजूनही तसाच आहे. तिथेही तोच वारा त्याच वेगाने वाहतोय. 1956 साली पंडित नेहरुंनी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता, तो ही आजच तशाच स्थितीत आहे. गद्दारांनी बनवलेला पुतळा तुटला, हा पुतळा चांगल्या मनाने बनवला नव्हता. राजकीय हेतूने हा पुतळा बनवण्यात आला होता. त्यामुळे सर्वात आधी मी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतोय. ते महाराष्ट्राच्या भावनेशी खेळलात. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना बरखास्त केले पाहिजे. कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही लाखो, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. आपापल्या लोकांना कंत्राटं दिली गेली. अरे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाही ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करत आहेत. यावर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडी याचा गांभीर्याने विचार करणार, असेही राऊत म्हणाले.

सत्तेची हवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. शिवाजी महाराज हे विश्वपुरुष आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुतळ्याचा अनावरणासाठी आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी खुप घाई गडबडीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

जिथे हात लावतात त्याची माती

मराठीत एक म्हण आहे, हात लावीन तिथे सोनं करीन. पण नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत तिथे ते हात लावतात त्याची ते माती करतात. अयोध्येतल्या राम मंदिराला हात लावला तिथून पाणी गळायला लागलं, नवीन संसद बनवली तिथून पाणी गळायला लागलं. पुलांचं उद्घाटन केलं ते उद्ध्वस्त झाले. कोस्टल रोड लीक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावला तो तुटला. गेल्या 70 वर्षातले हे पहिले पंतप्रधान आहेत जे कुठेही हात लावतात ते उद्ध्वस्त होतात. देशाला हात लावला, देश उद्ध्वस्त झाला. ही श्रद्धा असो वा अंधश्रद्धा पण हे आपल्या देशात होत आहे.

मुंबई गोवा महामार्गावर सर्वाधिक भ्रष्टाचार

मुंबई गोवा महार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली ते नाटक होतं. सर्वाधिक भ्रष्टाचार या मार्गावर झाले आहे. आणि सर्वाधिक कमिशनबाजी कंत्राटदाराकडून मुख्यमंत्र्यांच्या लोकांनी केली आहे.