लोकशाहीचा मुखवटा लावून हुकुमशाही आणणाऱ्यांना जनता माफ करत नाही, संजय राऊत यांचा घणाघात

शेख हसीना यांनी लोकशाहीचा मुखवटा लावून हुकुमशाही राबवली त्यामुळे जनतेने उठाव केला असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच अशा नेत्यांना जनता माफ करत नाही असा घणाघातही त्यांनी केला.

आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, शेख हसीना यांच्यावर सरकारने भुमिका स्पष्ट करावी. शेख मुजीबीर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे या देशाशी उत्तम संबंध आहेत. इंदिरा गांधींमुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. इंदिरा गांधींमुळे पाकिस्तान फाळणीचा बदला घेतला. पाकिस्तानची फाळणी केली आणि नव्या बांगलादेशची निर्मिती केली. पण बांगलादेश हा नेहमी अस्थिर राहिला. शेख हसीना यांच्या बाबतीत इतकंच सांगता येईल की लोकशाहीचा मुखवटा लावून जे कोणी आपल्या देशांमध्ये हुकुमशाही आणू इच्छितात, स्वातंत्र्य धोक्यात आणू इच्छिता ते कोणीही असूद्या जनता त्यांना माफ करत नाही, जनता रस्त्यावर उतरते असे राऊत म्हणाले.

तसेच हिंदुस्थानसारखी परिस्थिती बांगलादेशात निर्माण झाली होती. तिथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला. निवडणुकीत घोटाळे झाले. विरोधकांना तुरुंगात डांबलं, विरोधकांच्या हत्या करण्यात आल्या. संसदेत अनेक भयंकर कायदे करण्यात आले. जनता महागाई, बेरोजगारीशी लढत आली आणि शेख हसीना या पंतप्रधान म्हणून अपयशी ठरल्या. लोकशाहीची जपमाळ ओढत त्यांनी हुकुमशाहीनुसार देश चालवला, त्याचा काय परिणाम झाला याचा देशातील राज्यकर्त्यांनी चिंतन करावे असेही राऊत म्हणाले.

आज उद्धव ठाकरे दिल्लीत येणार आहेत. त्यावर राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना भेटतील. त्यात शरद पवार सुद्धा आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीवर त्यात चर्चा होणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत येणार आहेत. पुढील विधानसभा आपल्याला एकत्रितपणे कशा जिंकता येतील आणि जागावाटपामध्ये कुठलेही मदभेद नसावेत सर्व सुरळीत पार पडावं त्यामुळे महाविकास आघाडीतल्या प्रत्येत पक्षाचं दिल्लीतलं हायकमांड त्यांनी लक्ष ठेवावं. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात प्राथमिक चर्चा आणि बैठका सुरू केल्या आहेत. सात तारखेला मुंबईत एक बैठक होणार आहे अशी माहितीही राऊत यांनी दिली.