चंद्रचूड यांनी घटनाबाह्य कामं करून देशात एक प्रकारची आग लावली, संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलं असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच चंद्रचूड यांनी घटनाबाह्य कामं करून देशात एक प्रकारची आग लावली असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरकार आधी घटनाबाह्य पद्धतीने चाललं. चंद्रचूड यांनी घटनाबाह्य कामं करून देशात एक प्रकारची आग लावली. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलं. त्यात डी. व्हाय चंद्रचूड होते. आणि आता त्याच पद्धतीने घटनाबाह्य काळजीवाहू सरकार. 26 तारखेला स्थापन होणं आवश्यक होतं. आता त्यांचे भाडोत्री कायदेपंडित काहीही कागद आणून दाखवतील. पण आम्ही जर असतो तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लावली असती. अद्याप कुणाही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून 10 दिवस झाले आहेत. एवढं बहुमत असताना 24 तासांत सरकार स्थापनेचा दावा करायला हवा होता. अद्याप यांच्यापैकी कुणीही सरकार स्थापनेचा दावा कुणी का केला नाही. अद्याप मुख्यमंत्री कोण, भाजपचा विधीमंडळाचा नेता कोण? या संदर्भात निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठं बहुमत तरीही विधीमंडळ नेता ते अजून निवडू शकले नाही. अजूनही सरकार स्थापनेचा दावा केला नाही. सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांना कोणी भेटलं नाही आणि राज्यपालही हे काळजीवाहू सरकार चालू देतात. आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घोषणा करतात की पाच तारखेला शपथविधी होणार ते राज्यपाल आहेत का? यांना राज्यपालाचे अधिकार दिले आहेत का? सरकार स्थापन करण्याचा दावा अजून केलेला नाही तुम्ही घाबरले आहात का? ही अत्यंत गंभीर स्थिती घटनात्मक पेचप्रसंग काळजीवाहू सरकारच्या बाबतीतसुद्धा या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा निर्माण होत आहे. याला सर्वस्वी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

काल आम्ही बाबा आढाव यांना भेटून आलो. महाराष्ट्रात जे लोकशाहीचे अधःपतन झालं त्याविरोधात 95 वर्षांचा योद्धा, लढतोय. काल शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे सर्व नेते बाबा आढाव यांना भेटून त्यांचे आशिर्वाद घेतले आणि ही लढाई सुरूच राहिल संपणार नाही असा निर्धार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकसभा आणि राज्यसभेत आम्हाला प्रश्न विचारले जाऊ देत नाहीत. आम्ही एखादा प्रश्न विचारल्यास सभागृह तहकूब केली जाते. विधानसभेत यांच्याकडे इतकं बहुमत आहे की ते विधानसभेचं बहुमतही घेणार नाहीत. सागर बंगल्यावर किंवा नागपूरच्या बंगल्यात किंवा प्रांगात अधिवेशन घेतील. विरोधी पक्ष संपवायचा, लोकशाही टिकवायची नाही, अशा पद्धतीचे राज्य महाराष्ट्रात सुरू आहे. म्हणून बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं आणि आम्ही त्याला पाठिंबा दिला. आणि पुढल्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी आमच्या बैठका आणि चर्चा सुरू आहे अशी माहिती संजय. राऊत यांनी दिली.

अजमेर असो वा संभल चंद्रचूड यांच्या खंडपीठाने जो निर्णय दिला होता त्यामुळे देशात आग लागली. आणि ही आग लागून चंद्रचूड निवृत्त झाले. आज देशात अराजकता पसरली असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे. यासाठी चंद्रचूड यांनी जबाबदारी घ्यायला हवी होती असेही संजय राऊत म्हणाले.