तुम्ही बीफ खायचं अन् लोकांचं मॉब लिंचिंग करायचं, वा रे हिंदूत्व! बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीतील बिलावरून संजय राऊत यांचा भाजपवर प्रहार

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कारने नागपुरात पाच ते सहा गाड्यांना धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीमध्ये एक लाहोरी बारचे बिल मिळाले आहे. बावनकुळे यांचा मुलगा संकेत आणि त्याचे मित्र ज्या बारमधून बाहेर पडले तिथल्या खाण्या-पिण्याचे हे बिल आहे. या बिलवर दारू, चिकन, मटणसह बीफ (गोमांस) कटलेटचाही उल्लेख असल्याची चर्चा आहे. श्रावण, गणपती आहे असे म्हणत हिंदूत्व शिकवणाऱ्या लोकांनीच बीफ कटलेट खाल्ले असून हीच लोक या मुद्द्यावरून मॉब लिंचिंगही करतात. पोलिसांनी हे बिल जप्त केलेले असून तुम्ही बीफ खायचे अन् रस्त्यावर, रेल्वेमध्ये मॉब लिंचिंग करायचे. वा रे हिंदूत्व. तुम्ही काय आम्हाला हिंदूत्व शिकवणार, असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.

संजय राऊत यांनी या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही खरपूस समाचार घेतला. ज्या प्रकारे फडणवीस गृहखाते चालवत आहेत, त्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. चार वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात ते अनिल देशमुख यांना अटक करायला निघालेले आहेत. पण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्याच पक्षाच्या नेत्याच्या मुलाने दारू पिऊन गाड्या उडवत लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याला मात्र अभय दिले जात आहे. कुठे फेडाल हे पाप? असा सवाल तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यात हिंमत असेल आणि त्या स्वत:ला कायद्याच्या रक्षक समजत असेल तर त्यांनी हे बिल लोकांसमोर आणावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात केली जाईल. महाराष्ट्राला एवढा बेकार गृहमंत्री कधी लाभला नव्हता. नागपुरात त्यांच्या नाकासमोर एवढा मोठा अपघात झाला, 17-18 लोकं रुग्णालयात आहेत आणि ज्याच्या मालकीचे वाहन आहे त्याचे नाव साधे एफआयआरमध्येही नाही. जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवर होती आणि नंतर बदलण्यात आली त्याला वाचवले जात आहे.

मोठी बातमी: बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीत ‘बीफ कटलेट’चे बिल? व्हायरल पोस्टवरून सोशल मीडियावर चर्चा

नागपूर हिट अँड रन प्रकरण बेवडेबाजीचा प्रकार असून अशा प्रकारचा अपघात एखाद्या सामान्य माणसाने केला असता तर पोलिसांनी त्याला, त्याच्या कुटुंबाला, मित्रांना बखोटी पकडून रस्त्यावर धिंड काढली असती. पण सलमान खान सुटतो, एखाद्या बिल्डरचा मुलगाही सुटतो अन् संकेत बावनकुळेही सुटतो. तो कुणाचाही मुलगा असेना कायदा सर्वांसाठी समान हवा, असेही राऊत म्हणाले.

मणिपूरची अवस्था कश्मीरपेक्षाही भयंकर

मणिपूरमध्ये नेत्यांना मारले जातेय, महिलांना रस्त्यावर बेआब्रू केले जातेय, विद्यार्थ्यावर गोळीबार आणि बॉम्बहल्ला होतोय. दुसरीकडे गृहमंत्री मुंबईत येऊन निवडणुकांची तयारी तर आहेत. मोदी-शहा मणिपूरवर कधी बोलणार? की मणिपूर हातातून घालवायचे आहे? आता दोष द्यायला पंडित नेहरूही नाहीत. मोदी 11 वर्षापासून सत्तेवर असून मणिपूरची परिस्थिती एकेकाळी पेटलेल्या कश्मीरपेक्षाही भयंकर झाली आहे. यावर मोदी-शहा अवाक्षरही काढायला तयार नाहीत. मोदींनी युक्रेनच्या युद्धभूमीवर जाऊन जगाला हिरोसारखी अ‍ॅक्शन करून दाखवण्यापेक्षा देशाच्या काळजाचा तुकडा असणाऱ्या मणिपूरला जावे किंवा राजीनामा द्यावा.

मणिपूरबाबत न बोलणारे मोदी चीनबाबत काय हिंमत दाखवणार!

लडाख, अरुणाचल प्रदेश सर्वत्र चीन घुसलेला आहे. मणिपूरबाबत मौन बाळगणारे पंतप्रधान मोदी चीनबाबत काय हिंमत दाखवणार. हे घाबरलेले असून फक्त कमकूवत पाकिस्तानला डोळे वटारतील. चीनलाही डोळे वटारून दाखवा. चीन अरुणाचल प्रदेशमध्ये 60 किलोटमीर आत घुसला आहे. त्याहून अधिक जमीन लडाखमध्ये हडपलेली आहे. पण पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गप्प आहेत. अमित शहांची तर गोष्टच सोडा, कारण ते फक्त शेअर बाजाराच्या चर्चा करतील, असा टोला राऊत यांनी लगावला.

शिंदेंपेक्षा अजित पवारांचा हक्क

अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्याहूनही ज्येष्ठ नेते आहेत. अनुभवाच्या आधारे पाहिले तर मुख्यमंत्रीपदावर त्यांचाच हक्क बनतो. जर बेईमानाची तुलना केली तर शिंदेंहून अधिक बेईमानी अजित पवारांनीही केलेली आहे. बेईमानीचा तराजू दोघांचाही समान आहे, अशी टीका राऊत यांनी केली.