फडणवीस, शहांमध्ये हिम्मत असेल तर गायकवाड यांनी शिंदेंवर केलेल्या आरोपांची चौकशी करावी; राऊतांचे आव्हान

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माझे कोट्यवधी रुपये मुख्यमंत्र एकनाथ शिंदेंकडे पडल्याचे म्हटले आहे. शिंदेंनी मुलाची शपथ घेऊन सांगावे की गायकवाड यांनी हे रुपये तुमच्याकडे का ठेवले. गायकवाड यांना हे कोणत्या मार्गाने प्राप्त झाले? कोणत्या व्यवहारातून मिळाले? मुख्यमंत्र्यांकडे हे रुपये कशासाठी ठेवले? त्या पैशांचे पुढे काय झाले? हा ईडी-सीबीआयच्या तपासाचा विषय असून सरळसरळ मनी लॉन्ड्रिंगची केस आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यात हिम्मत असेल तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या आरोपांची चौकशी करावी, असे थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले.

फडणवीस म्हणतात चौकशीचे आदेश दिले आहेत. आदेश दिले म्हणजे का केले? भाजपचाच एक आमदार पोलीस स्थानकात गोळीबार करतो आणि फडणवीस चौकशीचे आदेश देताहेत, कोणाला मुर्ख बनवता. तुमचाच आमदार आहे, शिंदेंकडे कोट्यवधी रुपये ठेवल्याचे म्हणतोय. कोणता पैसा आहे हा? फडणवीस यांच्यात हिम्मतअसेल तर त्यांनी समोर येऊन सांगावे, अन्यथा आम्ही सांगू की हा पैसा कुठून आला, कोणाचा आहे आणि सध्या कुठे आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.

माध्यमांशी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, संपूर्ण राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरु आहे. मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मग ठाण्याचे असेल, डोंबिवलीतील असेल, मलबार हिलचे असेल किंवा साताऱ्याचे असेल, प्रत्येक ठिकाणी गुंडांना, झुंडाना, माफियांना खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे. अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना त्याकामी लावलेले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन केले जातात. पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात.

गणपत गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही, पण या राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काय चाललं आहे याचा उद्रेक आणि स्फोट गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झाला. दोन-तीन वेळा आमदार झालेले सांगतात की मला गुन्हेगार बनण्यासाठी, हातात हत्यार घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मजबूर केले. अत्यंत गंभीर आरोप आहे. त्या आरोपांची दखल ईडी, सीबीआय, पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेने घेतली पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरही राऊत यांनी भाष्य केले. छगन भुजबळ राजीनामा दिल्याचे म्हणतात, पण त्यानंतर ते कॅबिनेट बैठकीतही सहभागी झाले. ते ओबीसी समाजाची भूमिका मांडत असून कोणत्या ताटातील काढून दुसऱ्याला मिळू नये ही शिवसेनेचीही भूमिका आहे. मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य व्हाव्यात. पण ओबीसींच्या ताटातले ओरबाडून कोणाला देऊ नये ही आमची भूमिका आहे. भुजबळांनीही तिच भूमिका मांडली आहे. मात्र त्यासाठी महाराष्ट्रात इतका टोकाचा जातियवाद निर्माण करण्याची गरज नाही. महाराष्ट्र ज्या पद्धतीने जातियवादाच्या खाईत ढकलला जातोय हे राज्याच्या भविष्यासाठी चांगले नाही. भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका सरळसरळ मुख्यमंत्री आणि सरकारविरोधातील आहेत. जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणीतरी भूमिका घेतो तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केले जाते ही परंपरा आहे, असेही राऊत म्हणाले. तसेच भुजबळ म्हणतात मी राजीनामा दिला आणि तो स्वीकारला नाही. त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार शिंदे यांना आहे की फडणवीस यांना हे स्पष्ट करावे लागेल, असेही ते म्हणाले.