रोहित, विराटला खूप झाला आराम; आता मैदानात बोलवा – मांजरेकर

रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमरा हे हिंदुस्थानचे स्टार खेळाडू गेल्या पाच वर्षांत 40 टक्के सामनेही खेळलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी दुलीप करंडक स्पर्धेत खेळायला हवे होते. त्यांना आणखी किती विश्रांती पाहिजे, असा संतप्त सवाल हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी थेट विचारलाय.

गेल्या वर्षी देशांतर्गत स्पर्धेत इशान किशन आणि श्रेयस अय्यर खेळले नाहीत, म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत त्यांना बीसीसीआयच्या पेंद्रीय करारातून मुक्त करण्यात आले होते. आता हिंदुस्थानच्या देशांतर्गत क्रिकेटचा नवा मोसम सुरू होत असून दुलीप ट्रॉफीत अनेक दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. मात्र त्यातही काही दिग्गज खेळाडूंना आराम करण्याच्या हेतूने संघाबाहेर ठेवले आहे. त्यामुळे संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थान 249 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यापैकी रोहित केवळ 59 टक्के सामने खेळला असून विराटने 61 टक्के सामने खेळलेत. बुमरा तर फक्त 34 टक्के सामनेच खेळला आहे. मी त्यांना विश्रांती घेतलेले हिंदुस्थानी खेळाडू म्हणून पाहतो. त्यांची दुलीप ट्रॉफीसाठी निवड होऊ शकली असती. दुलीप ट्रॉफी 5 सप्टेंबर 2024 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर, बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. अक्षर पटेल, केएल राहुल आणि शुबमन गिल हे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. यापूर्वी कोहली, रोहित आणि बुमरा यांच्याशिवाय आर अश्विन, रवींद्र जाडेजालाही विश्रांती देण्यात आली आहे.  त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.