केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. पण ही नियुक्ती तात्पुतरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय वर्मा यांची नियुक्ती विधानसभा निवडणूक कालावधीसाठी राहील, असे गृह विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे. या शासन निर्णयावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे.
रश्मी शुक्ला या सेवानिवृत्त झाल्यानंतरही महायुतीने त्यांना पोलीस महासंचालक पदासाठी मुदतवाढ दिली होती. याविरोधात काँग्रेसने आवाज उठवला होता. याशिवाय विधानसभा निवडणूक निष्पक्षपतीपणे पार पडाव्यात म्हणून रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाने या मागणीची दखल घेत रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरून गच्छंती केली आणि त्या पदावर संजय कुमार शर्मा यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर संजय कुमार शर्मा यांनी मंगळवारी नव्या जबाबदारीचा पदभार स्वीकारला.
पण संजय कुमार वर्मा यांच्या नियुक्तीबाबत गृह विभागाने मंगळवारी जारी केलेल्या शासन निर्णयात ही नियुक्ती विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्ण होईपर्यंत राहील, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तर विधानसभा निवडणूक पूर्ण होईपर्यंत रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून त्यांच्या जागी संजय वर्मा यांची नियुक्ती करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही. तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? असा सवाल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. सरकारने चोवीस तासांत संजय वर्मा यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचे आदेश काढावेत अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात एकच अधिकारी लाडक्या आहेत का?
रश्मी शुक्ला यांना मिळालेली मुदतवाढ ही फक्त पोलीस महासंचालक पदासाठीच होती, दुसऱया कोणत्याही पदासाठी नाही, त्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि ज्याक्षणी निवडणूक आयोगाने त्यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवले त्याक्षणी त्या कायद्यानुसार निवृत्त झालेल्या आहेत, असे असताना त्यांना रजेवर कसे पाठवले जाते. महाराष्ट्रात एकच अधिकारी सरकारच्या सर्वात लाडक्या आहेत का, रश्मी शुक्लाच का, दुसरे अधिकारी नाहीत का, असा सवाल काँग्रेसने केला आहे.