काँग्रेसचा पोलीस ठाण्यात पाच तास ठिय्या, अखेर संजय गायकवाडांवर गुन्हा

आरक्षणाच्या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांची जीभ छाटणाऱ्यास 111 लाख रुपये इनाम देण्याची बिनडोक घोषणा करणारे मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसने पोलीस ठाण्यात तब्बल पाच तास ठिय्या दिला. काँग्रेसचे रौद्र रूप पाहून अखेर पोलिसांनी आमदार गायकवाडांवर गुन्हा दाखल केला.

अमेरिका दौर्‍यावर असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात आरक्षणासंदर्भात विधान केले. त्यावरून राहुल गांधी यांची जीभ छाटणारास 11 लाख रुपये इनाम देण्याची घोषणा मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली. आमदार गायकवाड यांच्या बेताल विधानामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी त्यांचा निषेध करण्यात येत आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर गोळा झाले. मात्र पोलिसांनी मिंधेगिरी करत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही, असे काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी ठणकावून सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यावेळी राज्य काँग्रेस कमिटीच्या सचिव जयश्री शेळके, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, दिलीप सानंदा, काँग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी, आमदार राजेश एकडे, आमदार धीरज लिंगाडे, संजय राठोड, प्रकाश पाटील अवचार, मिलन आंबेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या कुत्र्यांना गाडून टाकीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 19 सप्टेंबर रोजी बुलढाण्यात कार्यक्रम आहे. दुसरा कार्यक्रम लाडकी बहीणीचा आहे. गोरगरीब शेतकरी महिलाचा आहे. माझ्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कोणी कुत्र्यानी घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकून अशी धमकी पुन्हा आज काँगे्रसच्या पोलीस ठाण्याच्या आंदोलनानंतर आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

काँग्रेस दाखवणार मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

दरम्यान बुलढाणा पोलीस ठाण्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखणार असल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. बुलढाण्यात बसवलेले पुतळे हे प्लॅस्टीक व फायबरचे असुन सर्व पुतळ्याचे स्ट्रक्चलर ऑडीट करण्यात यावे. अशी मागणीही सपकाळ यांनी केली.