उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबईत शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांना उत्कंठावर्धक टक्कर दिली. एकूण 22 फेऱ्या आणि पोस्टल मतांची मोजणीही झाली. सर्व फेऱयांमध्ये संजय दिना पाटील हे कोटेच्या यांच्या पुढेच होते. त्यांनी कोटेचा यांचा 29 हजार 861 मतांनी पराभव केला. दरम्यान, संजय दिना पाटील यांचे विजयी म्हणून नाव घेताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला… अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
संजय दिना पाटील यांना एकूण 4 लाख 50 हजार 937 इतकी मते मिळाली. तर भाजपच्या मिहीर कोटेचा यांना 4 लाख 21 हजार 76 इतकी मते पडली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱयांमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पहायला मिळाली. 10व्या फेरीनंतर संजय दिना पाटील यांच्या आघाडीत कमालीची वाढ झाली ती वाढ शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. मिहीर कोटेचा यांना त्यांनी आसपासही फिरकू दिले नाही. दरम्यान, गेली दोन टर्म भाजपच्या पारडय़ात असलेला ईशान्य लोकसभा मतदारसंघ या वेळी शिवसेना पक्षाने अक्षरशः खेचून आणला.
पहिल्या फेरीपासून साहेबांच्या संपर्कात
उद्धव ठाकरे यांची भेट कधी घेणार असा सवाल पत्रकारांनी केला असता पहिल्या फेरीपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या संपका&त होतो. त्यांना प्रत्येक फेरीची अपडेट देत होतो, असे संजय दिना पाटील म्हणाले. तसेच राष्ट्रवादीने संधी दिल्याने ईशान्य मुंबईचा पहिला आमदार झालो, खासदार झालो आणि आता शिवसेनेकडून मला संधी मिळाली त्याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
दडपशाही करणाऱ्यांना मतदारांनी जागा दाखवली
दपशाही करणाऱ्या मोदी सरकारला मतदारांनी जागा दाखवली. कुठल्याही दबावाला किंवा पैशाच्या अमिषाला आणि भुलथापांना बळी न पडता ईशान्य मुंबईतील जनतेने भाजपाच्या उमेदवाराला जोरदार दणका दिला. निवडणूक प्रचारादरम्यान होत असलेल्या आचारसंहितेबद्दल स्वतः निवडणूक आयोगाला सांगूनही आमच्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी जेलमध्ये टाकले. असे अत्यंत खालच्या थराचे राजकारण सरकारने केले, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार संजय दिना पाटील यांनी दिली. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच सत्याचा विजय झाल्याचे ते म्हणाले. सर्व जातीधर्माच्या लोकांनी मला भरभरून मते दिल्याचे त्यांनी सांगितले.