मजूर संस्थांना काम देताना पालकमंत्री संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, मजूर संस्थेच्या अध्यक्षांचा आरोप

मजूर संस्थांना काम देताना पालकमंत्री संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात. कमिशन दिल्याशिवाय कामेच मिळत नसल्याचा आरोप पैठण येथील मौलाना आझाद मजूर संस्थेचे अध्यक्ष फेरोज शौकत पठाण यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. या आरोपाने सटपटलेले मंत्री सत्तार यांच्यावर या कार्यकर्त्याला भरसभेत खाली बसविण्याची नामुष्की ओढवली.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मजूर संघाची निवडणूक सध्या सुरू आहे. अब्दुल सत्तार यांच्या मजूर विकास पॅनल व अभिषेक जैस्वाल यांच्या पॅनलमध्ये ही निवडणूक होत आहे. मजूर विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ रत्नपूर येथून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी जिल्ह्यातील मजूर संस्थांचे अध्यक्ष व मतदान प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी पैठण येथील मजूर संस्थेचे अध्यक्ष फेरोज पठाण यांनी पालकमंत्री भुमरे हे कमिशन घेतल्याशिवाय कामे देत नसल्याचा आरोप केला. कामे मिळत नसल्याने मजूर संस्था अडचणीत आल्या आहेत. अनेक दिवसांपासून काही संस्थांना काम नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कमिशनच्या आरोपांमुळे व्यासपीठावरील उपस्थितांमध्ये खळबळ उडाल्याने गोंधळ उडाला. मंत्री सत्तार यांनी आरोप करणार्‍या अध्यक्षांना बळजबरीने खाली बसविले. तुम्ही मतदान नका करू, आमच्यावर आरोप करायचे नाही, असे भरसभेत सत्तार यांनी खडसावल्याने मतदारांमधून संताप व्यक्त होत आहे.