पश्चिम बंगालच्या संदेशखळी प्रकरणातील एका फिर्यादी महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याचं वृत्त आहे. संदेशखळी येथे तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख (वय 53) याच्यावर जमीन बळकावल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आता यातील एका महिलेने तक्रार मागे घेत भाजप नेत्याने आपल्या स्वाक्षरीने खोटी तक्रार केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी तीन महिलांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळात वादळ आलं होतं. त्यामुळे आता या महिलेच्या तक्रार मागे घेण्याने गोंधळात भर पडली आहे. तीन फिर्यादी महिलांपैकी एकीने आपलं लैंगिक शोषण न झाल्याचं म्हटलं आहे. तसंच या महिलेने भाजपच्या लोकांनी कागदावर स्वाक्षरी करून घेत पोलिसात तक्रार केली असं हिंदुस्थान टाइम्सने आपल्या वृत्तात टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने म्हटलं आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, माझ्यासोबत कोणताही लैंगिक छळ झालेला नाही. तसंच मला पक्षाच्या कार्यालयात थांबवूनही ठेवण्यात आलं नव्हतं. भाजप महिला मोर्चाचा एक स्थानिक नेता आणि काही समर्थक घरी आले. त्यांनी एका कोऱ्या कागदावर आपली स्वाक्षरी घेतली आणि मग ती खोटी तक्रार दाखल केली, असं या महिलेचं म्हणणं आहे.