मेफेड्रॉनचा मास्टरमाईंड धुनिया; पोलिसांची रेड कॉर्नर नोटीस

कोटय़वधींचे ड्रग्ज विदेशात पाठवले

राज्यासह देशात आणि परदेशात कोटय़वधी रुपयांचे मेफेड्रॉन तस्करी करणारा बिहारमधील संदीप धुनिया असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, तो काठमांडू मार्गे नेपाळमध्ये पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. त्याने फूड पॅकेटद्वारे विमानाने इंग्लंड आणि इतर देशांत मेफेड्रॉनची कोटय़वधी रुपयांची तस्करी केली आहे.

पुणे गुन्हे शाखेने उघडकीस केलेल्या मेफेड्रॉन तस्करीच्या रॅकेटची पाळेमुळे खोलवर पसरली आहेत.  कुरपुंभ परिसरातील औद्योगिक पंपनीत दोन ते अडीच वर्षांपासून अमली पदार्थ तयार केले जात होते. त्याची विक्री अमली तस्कर मास्टरमाइंड संदीप धुनिया करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वी पुण्यात दाखल झालेल्या अमली पदार्थांच्या गुह्यात धुनियाचा सहभाग होता. याशिवाय बिहारमधील पाटणा येथे त्याच्याविरुद्ध एकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. संदीप धुनिया आणि विपिन कुमार हे 2016 पासून ड्रग्ज प्रकरणात सहआरोपी आहेत. दरम्यान, विपिन कुमारची पत्नी दोन मुलांसह संदीप सोबत पळून गेली होती. याप्रकरणी विपिनच्या वडिलांनी संदीपविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली. अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, संदीपने विपिनच्या वडिलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.

मेफेड्रॉन तस्करीसाठी हवालाचा पैसा

अमली पदार्थांच्या व्यवसायासाठी हवालाचा पैसा वापरला जात होता. आरोपीची मैत्रीणही रोख रक्कम वसूल करण्यात मदत करत आहे. आरोपीने त्याच्या मैत्रिणीचा वापर करून ग्राहकांकडून ड्रग डील पेमेंट वसूल केले. पोलिसांकडून मुख्य आरोपी संदीप आणि त्याच्या मैत्रिणीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, भीमाजी उर्फ अनिल साबळे यांच्या पंपनीला यापूर्वी दिवाळखोरी आणि आगीच्या घटनेला सामोरे जावे लागले होते. त्याने बँकेकडून 14 कोटींचे कर्ज घेतले होते, ते फेडता येत नसल्याने आर्थिक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन संदीपने त्याला दिले. साबळे हे व्यवस्थापकीय संचालक होऊन औषध व्यवसाय सुरू केला.

मेफेड्रॉन तस्करी प्रकरणात अंडरवर्ल्ड आणि दहशतवादाशी संबंधांची चौकशी केली जात आहे. वेगवेगळ्या शहरांत आणखी ड्रग्ज सापडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 1800 किलो ड्रग्ज जप्त केले असून, अजूनही तपास करीत आहे. मुख्य आरोपींसाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर