लष्करी अभियंत्यांना सॅल्यूट! सिक्कीममध्ये वाहत्या नदीवर उभारला 48 तासात पूल

सिक्कीममध्ये पावसामुळे दाणादाण उडाली आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पूर आल्याने संपर्क तुटला आहे. उत्तर सिक्कीममध्ये हजारो पर्यटक आणि नागरिक अडकले होते. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लष्कराने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. हिंदुस्थानी लष्करातील अभियंत्यांनी दुथडी भरून वाहणाऱया नदीवर अवघ्या 48 तासात 150 फूट लांबीचा झुलता पूल उभारला आहे. अभियंत्यांच्या या कामाचे सध्या कौतुक होत आहे.

लष्कराने 20 नॉट्सपेक्षा जास्त वेगाने वाहणाऱया नदीपात्राच्या पाण्यावर झुलता पूल उभारण्यास सुरुवात केली आणि हे काम अवघ्या 48 तासांत पूर्ण करून दाखवले. या पुलाचे बांधकाम अत्यंत आव्हानात्मक होते. प्रतिकूल हवामान आणि वेगाने वाहणारे पाणी असूनही हिंदुस्थानी लष्करातील अभियंत्यांनी आपला कस लावून हे काम पूर्ण केले.

संरक्षण मंत्रालयाने यासंबंधीची एक प्रेस नोट सोशल मीडियावर शेअर केली आहे. काही फोटोही शेअर केले आहेत. सिक्कीममधील कठीण काळात या सीमावर्ती गावांतील रहिवाशांना आवश्यक साधने आणि आधार देण्यासाठी हा पूल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. गरजेच्या वेळी ताकद देणारा आधारस्तंभ ही लष्कराची ओळख पुन्हा एकदा दृढ झाली आहे, असेही लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

– 13 जून रोजी मुसळधार पाकसामुळे उत्तरी सिक्कीमच्या मंगन जिह्यातील पूल कोसळला होता. त्यामुळे येण्या-जाण्यासाठी नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली होती. दीड हजारांहून अधिक जण अडकले होते. लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. यामुळे 48 तासात पूल पुन्हा उभा करणे लष्करामधील अभियंत्यांसमोर मोठे आक्हान उभे ठाकले होते. परंतु हे आक्हान लष्करातील अभियंत्यांनी यशस्कीरित्या पेलले.