दुसऱयाच दिवशी बटचा पत्ता कट; पाकिस्तान निवड समितीच्या सल्लागारपदी केली होती निवड

पाकिस्तानच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेल्या वहाब रियाझने निवड समितीच्या सल्लागारपदी सलमान बटची केलेली सेटिंग महागात पडली आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाच वर्षांच्या बंदीचा सामना करणाऱया बटचा डागाळलेला खेळाडू म्हणून निवड समितीतून पत्ता कट करण्यात आला आहे. खुद्द पीसीबीने बटला निवड समितीतून काढण्यात येत असल्याची माहिती दिली.

शुक्रवारीच रियाझने सलमान बटला आपला सल्लागार बनवण्याचा धाडसी निर्णय सर्वांच्या माथी मारला होता. पण बटची निवड पीसीबी असो किंवा क्रीडाप्रेमी कुणालाच पटली नाही आणि चोहोबाजूंनी बटवर टीका होऊ लागली. निवड जाहीर होताच झालेल्या टीकेला शांत करण्यासाठी पीसीबीने बटला थेट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि या टीकेला तूर्तास शमवले. वन डे वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानी संघात होलसेल बदल करण्यात आले. बाबर आझमला तिन्ही क्रिकेटचे कर्णधारपद सोडावे लागले. त्यामुळे तिन्ही क्रिकेटला नवे नेतृत्व देण्यात आले. तसेच निवड समितीसह अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱयाही बदलण्यात आल्या होत्या.

बटवर पाच वर्षांची बंदी
सलमान बटवर 2010 मध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना फिक्स केल्याबद्दल पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या बंदीमुळे बटची कारकीर्द आपोआपच संपली. त्याच्यावर 2010 मध्ये बंदी लादण्यात आली आणि ती 2015 मध्ये संपली होती. 2016 मध्ये तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उतरला आणि त्याने बऱयापैकी खेळ दाखवला. त्याच्यावर झालेल्या आरोपातून त्याची कारकीर्द पुनरागमन करू शकली नाही. सलमान बट पाकिस्तानसाठी 33 कसोटी सामने खेळला आणि त्याने 30.47 च्या सरासरीने 1889 धावा केल्या.