बांधकाम कामगारांच्या योजनेसाठी सलील देशमुख उच्च न्यायालयात

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु, भाजपचे आमदार त्यांच्याच लोकांना सर्व योजनांचा लाभ देत असून इतर भागातील बांधकाम कामगार त्यांच्या हक्कापासून वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली आहे.

येत्या शुक्रवारपासून याप्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान, सलील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी उद्या सकाळी 10 वाजता नागपूर येथील संविधान चौकातून महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या योजनेत प्रामुख्याने संसारोपयोगी साहित्य, घरकुलासाठी मदत, मुलांच्या शिक्षणासाठी मदत यासह जवळपास 28 योजना राबवल्या जातात.