मोदी सरकार लॉरेन्स बिष्णोईचा वापर करतेय, तुरुंगात असूनही हत्या कशा होतात? साकेत गोखले यांचा गंभीर आरोप

अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने स्वीकारली, परंतु बिष्णोई हा गुजरातमधील तुरुंगात असूनही हत्या कशा काय घडवून आणतो? तुरुंगात असूनही तो इतका पॉवरफुल्ल कुणामुळे आहे? त्याला इतर प्रकरणांत चौकशीसाठी तपास यंत्रणांकडे सोपवण्यास किंवा गुजरातबाहेरच्या तुरुंगात पाठवण्यास मोदी सरकार सातत्याने का विरोध करत आहे? त्याला कोण संरक्षण देतेय? असे अनेक सवाल उपस्थित करतानाच मोदी सरकार बिष्णोईचा वापर करतेय का, की त्याला सरकारनेच जाणूनबुजून मोकळीक दिली आहे, असा गंभीर आरोप तृणमूलचे खासदार साकेत गोखले यांनी केला आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने महाराष्ट्र आणि देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना आता साकेत गोखले यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्ताचा हवाला देत लॉरेन्स बिष्णोई टोळीसंदर्भात मोदी सरकारला धारेवर धरत एक्सवरून जोरदार धमाके केले आहेत. लॉरेन्स बिष्णोई टोळीला कोण संरक्षण देतेय? असा सवाल उपस्थित करत साकेत गोखले यांनी पेंद्र सरकारच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे. कॅनडाच्या अधिकाऱ्यांची आणि हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची गेल्या आठवडय़ात सिंगापूरमध्ये भेट झाली. या भेटीत कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी अजित डोवाल यांना कागदपत्रे दिली. यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा कॅनडात हत्या आणि खंडणीच्या प्रकरणांमध्ये सामील असल्याचा दावा कॅनडाने केला, असे वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटल्याचे साकेत गोखले यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. मला कॅनडाच्या दाव्यात पडायचे नाही, परंतु या ठिकाणी लॉरेन्स बिष्णोई आणि मोदी सरकारबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे साकेत गोखले यांनी म्हटले आहे.

साकेत गोखले यांनी उपस्थित केलेले प्रश्न

n गुजरातमधील तुरुंगात असूनही लॉरेन्स बिष्णोई इतका पॉवरफुल कसा?

n लॉरेन्स बिष्णोई याला इतर प्रकरणांत चौकशीसाठी सोपवण्यास किंवा गुजरातबाहेरच्या तुरुंगात पाठवण्यास मोदी सरकार इतका विरोध का करतेय?

n गुजरातच्या तुरुंगात राहून लॉरेन्स बिष्णोई हा हिंदुस्थान आणि परदेशात खंडणी तसेच हत्या कशा काय घडवून आणू शकतो?

n बिष्णोईला कोण संरक्षण देतेय? कुणाच्या इशाऱ्यावर तो काम करतोय?

बिष्णोईला सरकारकडूनच मोकळीक

कॅनडाच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी हिंदुस्थान सरकारने उत्तम तयारी केली, परंतु सिद्धू मुसेवाला, बाबा सिद्दिकी, दिल्लीतील जाम मालक आणि इतर अनेकांच्या हत्येत लॉरेन्स बिष्णोईचा हात आहे. हे लक्षात घेता लॉरेन्स बिष्णोई हा गुन्हेगार म्हणून तुरुंगात आहे, की मोदी सरकार त्याचा वापर करत आहे? की त्याला सरकारनेच जाणूनबुजून मोकळीक दिली आहे, असे सवाल साकेत गोखले यांनी उपस्थित केले आहेत. कॅनडाने काय दावे केले आहेत, ते फार महत्त्वाचे नाही, परंतु बिष्णोईची नेमकी भूमिका आणि स्टेटस काय, याचे मोदी सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही साकेत गोखले यांनी केली आहे.