सिनेमा – सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ

>> प्रा. अनिल कवठेकर

समाजात मोठी क्रांती झाली आहे. तंत्रज्ञान, मोबाइल, विज्ञान ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत मानव पोहोचलेला आहे. तरीही प्राचीन मूल्ये, सामाजिक मूल्ये आपल्या देशातला मध्यमवर्गीय समाज अजिबात सोडायला तयार नाही. जणू हे सामाजिक संस्कार जपणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, अशा चुकीच्या वा आग्रही भूमिकेतून तो प्रत्येक क्रांतीच्या विचाराला विरोध करत असतो. आजही आपल्या देशातल्या जनतेला शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक व आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून हवा असतो. शिक्षकाने त्याचे आयुष्य कसे जगावे हे शिक्षकाला ठरवण्याचा अधिकार नाही, कारण ते समाजाने आधीच ठरवलेले आहे. समाज वाटेल तसा जगू शकतो. त्याला कोणीच नावे ठेवत नाही; पण ती गोष्ट जर शिक्षकाकडून चुकून झाली तर समाज त्याला माफ करत नाही. असे दुटप्पी धोरण असणाऱ्या सामाजिक वर्तनाचे प्रामाणिकपणे चित्रिकरण करणारा चित्रपट म्हणजे ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ!’

शाळेमध्ये ज्या शिक्षिकेकडे अत्यंत सन्मानाने, आदर्श म्हणून पाहिले जाते, अशा सजनी शिंदे या शिक्षिकेच्या नृत्याच्या व्हिडीओमुळे होणाऱ्या प्रचंड सामाजिक गदारोळावर बेतलेला ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ आहे. पुन्हा एकदा शिक्षकाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट आहे. एका शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांचा ग्रुप दुबईला जातो आणि तिथल्या एका हॉटेलमध्ये ते सगळे सजनीचा वाढदिवस साजरा करतात. ते तिला ड्रिंक्स घेण्याचा आग्रह करतात. ती तिच्या भावी पतीला विचारते तर तोही तिला घ्यायला काही हरकत नाही असे सांगतो. पण ड्रिंक्स जास्त झाल्यामुळे तिचे स्वतःवरचे नियंत्रण सुटते आणि अनेक वर्षे मनामध्ये दाबून ठेवलेल्या भावना नृत्यातून प्रकट करते. दोन तरुणांच्या मध्ये उभे राहून सँडविच नृत्य करते. त्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो. शिक्षिकेचे नाचणे हा त्यातला सगळ्यात मोठा आक्षेपार्ह भाग असल्याचे मध्यमवर्गीय समाज ठरवून टाकतो.

व्हायरल झालेला तो व्हिडीओ सगळेच चवीने पाहतात. मॅनेजमेंटला ते नृत्य सनी लियोनीपेक्षाही अश्लील वाटते. म्हणजे मॅनेजमेंटला सनी लियोनीचे नृत्य माहीत असते. सनी लियोनीला तिचा इतिहास बाजूला सारून सन्मान देणारा पण हाच समाज आहे. टूरवर गेलेल्या त्या शिक्षकांचा ग्रुप दुबईवरून आपल्या देशात परतण्यापूर्वीच त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलेले असते.

या प्रकारामुळे सजनी आत्महत्येचा प्रयत्न करते. तिची सहकारी तिला तसे करण्यापासून परावृत्त करते. घरून मॉरल सपोर्ट तिला अजिबात मिळत नाही. तिच्या व्हायरल व्हिडीओवर येणारे असंख्य अश्लील कमेंट्स तिला डिस्टर्ब करतात.
सजनी एक उत्तम शिक्षिका आहे. अत्यंत प्रामाणिकपणे ती मुलांना विषय समजेल असा शिकवण्यात प्रयत्नशील आहे. आपल्या भावी नवऱ्याला ती पहिल्यांदा भेटायला जाते, तेव्हा तिच्या सोबत सायन्स एक्झिबिशनकरिता तयार केलेले भूकंपाची सूचना देणारे मॉडेल असते. (भूकंपाची सूचना देणारे हे यंत्र कदाचित भविष्यात तिच्या आयुष्यात घडणाऱ्या भूकंप सुचवणारे यंत्र असावे) यावरून सजनीचा प्रामाणिकपणा, अभ्यासू वृत्ती, विषयासाठी वाहून घेण्याची वृत्ती यातून स्पष्ट होते.

पण प्रत्यक्षात जेव्हा तिचा व्हिडीओ व्हायरल होतो तेव्हा तिचा भावी पती भडकतो आणि म्हणतो, ‘तुला इतकं मॉडर्न व्हायला मी सांगितलं नव्हतं.’ शेवटी प्रत्येक पुरुषाच्या उदारमतवादी विचारात बायको किती मॉडर्न असावी याचे त्याने स्वतः रेखाटलेले एक चित्र असते. जेव्हा ते चित्र विस्कटायला लागते तेव्हा त्याचा इगो अचानक जागा होतो. तोही या चित्रपटाचा आणखी एक पैलू आहे. माणूस किताही उच्चशिक्षित झाला आणि त्याचा आयक्यू कितीही मोठा असला तरी तो एक माणूस असतो. त्यात तो जर आपल्या देशातला असेल तर तो पारंपरिक असणारच.

प्राचार्या आणि ज्या शिक्षिकेने तो व्हिडीओ व्हायरल केलेला असतो त्या दोघींमध्ये वाद होत असताना सजनीचा एक मेसेज येते आणि त्यात ती आई-वडील, होणाऱ्या पतीला दोष देते. त्या संदेशात ती असेही म्हणते की, मी केलेली चूक इतकी मोठी नव्हती. ज्याची मला खूप मोठी शिक्षा सगळेजण देत आहेत. समाजात अशा अनेक घटना घडत असतात. पण समाज आणि समाजातील इतर घटक त्याची शिक्षा मुलीलाच देतात. हा नेमका धागा या चित्रपटाने अत्यंत उत्तमरीत्या गुंफलेला आहे. पटकथा इतकी वेगळी आहे की, सजनी गायब आहे आणि तिची सुसाईड नोट पोलिसांच्या हातात आहे. तिच्या वडिलांना भेटायला बेला नावाची इन्स्पेक्टर आपल्या सहकाऱयांबरोबर जाते. तेव्हा सजनीचा नाट्य कलाकार बाप सूर्यकांत शिंदे स्टेजवर नाटक सादर करत असतो. सत्तेचा आणि प्रसिद्धीच्या अहंकारातून तो बेलाने विचारलेल्या प्रश्नांना उद्धटपणे उत्तरे देऊन तिचा अपमान करतो. मराठी भाषा न कळणाऱ्या बेलाला त्याच्या उद्धटपणावरून कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय येतो. मुलगी गायब आहे आणि घरची मंडळी मात्र मटणावर ताव मारतात. सिद्धांत, सजनीचा भावी पती आपले सिमकार्ड बदलून पळून जातो. कोणत्याही गोष्टीचे भांडवल करणारा वर्ग म्हणजे राष्ट्रीय महिला समितीमधल्या काही महिला… त्यांचे प्रतिनिधित्व करणारी एक राष्ट्रीय महिला समिती यात दाखवली आहे. वकिलाचे संवाद व दृश्ये छोटी आहेत, पण आशयपूर्ण व परिणामकारक आहेत.

सिद्धांतचे सजनीच्या बहिणीला भेटणे, सजनीचा भाऊ आकाश आपल्या गँगला घेऊन जाणे, खानावळमध्ये बेला आणि सहकारी राम यांची दृश्ये, आईने बिनसाखरेची कॉफी आणली म्हणून तिला भावी जावयासमोर शिव्या देणारा आणि माझ्या मुलीकडून तूसुद्धा अशीच कामे करून घे व तिला चांगले राबव असा सल्ला देणारा मुलीचा बाप, मुलगी गायब आहे आणि विवाहाची पत्रिका तिच्या भावी नवऱ्याला दाखवून तपासायला सांगणारा तिचा बाप… सजनी अजून मृत आहे की बेपत्ता हे सिद्ध झालेले नाही, तरी हाय प्रोफाइल लोकांमध्ये सजनीला दिली जाणारी श्रद्धांजली, सिद्धांतचा वकील आणि सूर्यकांत शिंदेचा वकील यांच्या भेटीतला संघर्ष… हे सगळे सीन एक विलक्षण चित्तवेधकता निर्माण करतात. काही संवाद इतके जबरदस्त आहेत की त्यात होत्याचे नव्हते करून टाकण्याची क्षमता आहे.

दिग्दर्शनातील काही सुंदर गोष्टी सांगायला हव्यात. सूर्यकांत शिंदे नाटकाची घंटा झाल्यानंतर रंगमंचावर एंट्री घेतो त्याच वेळी त्याच प्रेक्षागृहातून त्याची बायको त्याच्या आयुष्यातून एक्झिट घेते. ज्या हॉटेलमध्ये या घटना घडतात त्या हॉटेलचे नाव ‘हॉटेल रंगमंच’ हे खूपच सूचक आहे. सर्वच महत्त्वाचे कलाकार आणि दिग्दर्शक मिखिल मुसळे हा मराठीच असल्यामुळे पुण्याच्या प्राचीन परंपरेला साजेसा विरोध इथे जाणवतो. हीच घटना मुंबईत घडली असती तर कदाचित तितकी प्रभावीपणे मांडता आली नसती. मराठी कलावंतांच्या अभिनयाची ताकद यात पाहायला मिळते. शेवटच्या वीस मिनिटांत चित्रपट नेहमीसारखा घडत जातो आणि तो संपल्यानंतर प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला जातो की, सजनीच्या आत्महत्येला जबाबदार कोण? तिचे पालक, समाज, की ती महिला संस्था? या प्रश्नांभोवती फिरत सामाजिक प्रश्नावरचा हा चित्रपट संपतो.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)