मोदींच्या मतदारसंघात साईबाबा हटाओ! ब्राह्मण सभेच्या आदेशावरून 14 मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

सर्व जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश देणारे महान संत साईबाबा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातच ब्राह्मण सभेने विस्थापित केले आहे. ब्राह्मण सभेने वाराणसीतील 14 मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती तसेच प्रतिमा हटवल्या आहेत. साईबाबांची पूजा करणे म्हणजे प्रेताची पूजा करण्यासारखे आहे, असे विखारी मतही ब्राह्मण सभेने व्यक्त केले आहे.

केंद्रीय ब्राह्मण सभेने शिर्डीचे साईबाबा हे सनातन नसल्याचा दावा केला असून त्यांची पूजा करू नये तसेच मंदिरात लावण्यात आलेल्या त्यांच्या प्रतिमा, मूर्ती हटवण्यात याव्यात असे फर्मान काढले आहे. ब्राह्मण सभेच्या या फर्मानावरून संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. ब्राह्मण सभेच्या फर्मानाचा सर्वाधिक परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात झाला आहे. वाराणसीतील सनातन रक्षक दलाने ब्राह्मण सभेने दिलेल्या आदेशावरून बडा गणेश मंदिरातील साईबाबांची प्रतिमा हटवली. त्यानंतर पुरूषोत्तम भगवान मंदिरातील प्रतिमाही काढण्यात आली. सनातन धर्मात साईबाबांची पूजा सांगितलेली नाही, असा दावा या रक्षक दलाने केला. कोणत्याही शास्त्रात साईबाबांच्या पूजेचा उल्लेख नाही असेही या दलाचे म्हणणे आहे. गणेश मंदिर, पुरूषोत्तम मंदिरापाठोपाठ इतर 14 मंदिरातूनही साईबाबांची मूर्ती तसेच प्रतिमा हटवण्यात आली.

साईबाबांना होणारा विरोध नवा नाही

साईबाबांना उत्तरप्रदेशात होणारा विरोध नवा नाही. यापूर्वी शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही साईबाबांच्या देवत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

मोदी साईबाबांसमोर नतमस्तक

गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीच्या दौऱ्यावर आले होते. ‘सब का मालिक एक’ असा विश्वव्यापी संदेश देणाऱ्या साईबाबांसमोर मोदी नतमस्तक झाले होते. मोदींच्या हस्ते शिर्डीतील 700 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे लोकार्पण झाले होते.

साईबाबा नव्हे हे तर चांदमियां

सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्यक्ष अजय शर्मा यांनी साईबाबांच्या धर्मावरच प्रश्न उपस्थित केला. साईबाबा नव्हे, हे तर चांदमियां आहेत, असे शर्मा म्हणाले. सनातन संस्कृती आणि वैदिक कर्मकांड हिंदू विसरले आहेत. काशीत 33 कोटी देवता विराजमान आहेत. हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असलेल्या काशीतील मंदिरांमध्ये या चांदमियांचे काय काम? असेही ते म्हणाले.