परदेशी ‘पाहुण्यां’ची सुरक्षा वाऱ्यावर; राज्य जैवविविधता मंडळाचा गौप्यस्फोट

उरण आणि पनवेल परिसरातील पाणथळीत दरवर्षी लाखो परदेशी स्थलांतरित पक्षी येतात. त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही फ्लेमिंगोंची असते. मात्र या पक्ष्यांचे संरक्षण आणि त्यांचा अभ्यास या बाबी सरकारने वाऱ्यावर सोडल्या आहेत. या पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी एकही अभ्यास गट राज्य सरकारने तयार केलेला नाही, असा गौप्यस्फोट महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पर्यावरणवादी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पाणजे पाणथळ जागेत दरवर्षी पाच लाख तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात दोन लाखांहून अधिक स्थलांतरित पक्षी वास्तव्यास येतात. हे पक्षी तिथे घरटी बांधून प्रजनन करतात. स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी जैवविविधता मंडळाची आहे.

बीएनएचएसनेही उरण, पनवेल परिसरातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणथळ जागांमधील जैवविविधता आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या संरक्षण व माहिती संकलित करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याची मागणी केली होती. मात्र याला शासनाने केराची टोपली दाखवला.

माशांची संख्याही कमी झाली
माती दगडाच्या भरावामुळे पाणथळ जागा नष्ट होऊ लागल्या आहेत. यामुळे उरण, पनवेल परिसरातील चिखलयुक्त जागांचे प्रमाण घटत चालले आहे. त्यामुळे प्रजननासाठी सागरी, खाडीकिनाऱ्यावर येणाऱ्या विविध प्रकारच्या माशांची संख्या कमी झाली आहे. वास्तव्याची ठिकाणे नष्ट होऊ लागली असल्याने स्थलांतरित पक्ष्यांचीही संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र स्मॉल स्केल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली आहे. 3 मंडळाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उरण गट विकास अधिकाऱ्यांवर याबाबत खापर फोडले आहे. या दोन्ही यंत्रणांनी अद्यापही अभ्यास गट स्थापन केला नसल्याचे एकवीरा आई फाऊंडेशनचे संचालक नंदकुमार पवार यांनी सांगितले.