तीन कामगारांच्या बळीनंतरही साधना नायट्रोकेम सुरूच; स्फोटानंतर बारा तासात प्लाण्ट गुपचूप चालू केला

धाटाव एमआयडीसीमधील साधना नायट्रोकेम या कंपनीत गुरुवारी सकाळी केमिकल टँकचा भीषण स्फोट होऊन तीन कामगार ठार तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर बारा तासातच व्यवस्थापनाने ऑर्डरचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी केमिकलचे उत्पादन सुरू केले. ज्या प्लाण्टमध्ये ही घटना घडली तोच प्लाण्ट तब्बल पाच तास चालू होता. कामगारांच्या जिवाशी खेळ केल्याने व्यवस्थापनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून मालक व मॅनेजरवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

साधना नायट्रोकेम या कंपनीत मिथेनॉल व टोल्यून या सॉल्व्हन्ट बेस केमिकलचे उत्पादन करण्यात येते. सीएफ २ या प्लाण्टमध्ये गुरुवारी सकाळी सवाअकराच्यासुमारास अचानक स्फोटहोऊन त्यात संजीत कुमार, दिनेश कुमार व बास्की यादव या तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर जे.टी. कुट्टी यांनी संध्याकाळी काही कामगारांना बोलावून तुम्ही कामावर या, आपल्याला ऑर्डरचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्लाण्ट परत सुरू करायचा आहे असे सांगितले. मात्र आधीच घाबरलेल्या कामगारांनी पुन्हा कामावर येण्यास नकार दिला.

मॅनेजरने कंपनीबाहेरील काही कामगारांना घाईने बोलावून रात्री सीएफ २ प्लाण्ट सुरू केला व केमिकलचे उत्पादन पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीचा मॅनेजरला फोन येताच कंपनी बंद केली. ती व्यक्ती कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. कामगारांच्या जिवाशी खेळण्याचाच हा प्रकार असून या घटनेविरुद्ध संपूर्ण धाटाव एमआयडीसीत चीड निर्माण झाली आहे. या बेफिकीर व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणीही करण्यात येत आहे.

शिवसेना आक्रमक
तिघांचे जीव जाऊनही प्रोडक्शन सुरू करणाऱ्या व्यवस्थापनाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. विशेष म्हणजे साधना नायट्रोकेमचे मालक असित झव्हेरी तसेच प्रोडक्शन मॅनेजर जे.टी. कुट्टी यांच्यावर दोन दिवस उलटूनही कारवाई झालेली नाही. याप्रकरणी हलगर्जीपणा करण्यात आला असून मॅनेजरवर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे.