शेतकऱ्यांना रस्त्यावर पाहून दुःख होतेय; शंभू सीमेवर पोहोचताच भावुक झाली विनेश फोगाट

मी शेतकरी कुटुंबात जन्म घेतला याचा मला अभिमान वाटतो. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही. आपल्यालाच आपली लढाई लढावी लागणार आहे. मागण्या मान्य करण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याचे पाहून मला प्रचंड दुःख होतेय, अशा शब्दांत प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. शंभू सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 200 दिवस पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विनेश फोगाटने घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला. या वेळी शेतकऱ्यांनी तिचा सत्कार केला.

शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी यासाठी पंजाब आणि हरयाणामधील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. हजारो शेतकरी गेल्या 200 दिवसांपासून शंभू सीमेवर उन्हातान्हात, भर पावसात आंदोलन करत आहेत. 200 दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला बसले आहेत, हे पाहून मनला दुःख होते. शेतकरी हेच देशाला चालवतात. त्यांच्याशिवाय देश काहीच नाही, आम्ही खेळाडूही त्यांच्यासमोर काहीच नाही. त्यांनी जर अन्न दिले नाही तर आम्ही स्पर्धा करू शकत नाही. मी खेळाडू म्हणून शेतकऱ्यांसाठी काही करू शकत नाही, हे पाहून कधी कधी लाचारी वाटते. त्यामुळे सरकारला माझे निवेदन आहे की, त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. मागच्या वेळी सरकारने आपली चूक मान्य करत तीन कृषी कायदे मागे घेतले होते.  या वेळीसुद्धा सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, असेही पह्गाट म्हणाली. शेतकरी जर असा अनेक दिवस आंदोलनाला बसून राहिला तर आपला देश पुढे जाणार नाही. 200 दिवस आंदोलनाला बसूनही शेतकऱ्यांचे धैर्य कमी झालेले नाही. मीही दिल्लीत आंदोलनाला अनेक दिवस बसले होते. पण आज इथे आल्यावर दिसले की, पहिल्या दिवसासारखाच उत्साह शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे, असे विनेश म्हणाली.