सामना अग्रलेख – मस्तवाल वेदांत अग्रवाल!

वेदांत अग्रवाल याला वाचवण्याचा प्रयत्न करणारे अमानुष व समाजाचे गुन्हेगार आहेत. अश्विनीचा मृतदेह पाहून तिच्या आईने रुग्णालयातच हंबरडा फोडला. त्या माऊलीच्या आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंतींना पाझर फुटला, पण पुणेकर थंडपणे हा निर्घृण प्रकार पाहत बसले. आमदार रवींद्र धंगेकरांनी यावर आवाज उठवला. आता पोलीस आयुक्त कामाला लागले आहेत. वेदांतला दारू पाजणाऱ्या बार मालकाला अटक केली आहे. कोट्यवधींची पोर्शे गाडी नंबरप्लेटशिवाय बेवड्या मुलाच्या हाती देणारा बिल्डर विशाल अग्रवाल यालाही छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे. हे सगळे असले तरी दोघांना चिरडून मारणाऱ्या वेदांतला तुरुंगात पाठवायलाच हवे. पुणेकरांनो, तुम्हाला त्यासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल!

पुण्याचे पोलीस, न्यायालय इतके मुर्दाड कसे? कायदा व पोलीस श्रीमंत शेठजींच्या कोठीवर कसे नाचत असतात ते पुण्यातील वेदांत अग्रवाल प्रकरणात दिसले. पुण्यातील एक धनिक बिल्डर विशाल अग्रवाल याचा मुलगा वेदांत अग्रवाल याने दारूच्या बेधुंद नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून दोन निष्पाप जिवांचा बळी घेतला. अनिश अवधिया व अश्विनी कोस्टा या पंचविशीतल्या तरुणांची या मद्यधुंद पोराने पुण्याच्या भररस्त्यावर हत्याच केली. या पोरांचे जीवन सुरू होण्याआधीच संपवले. ही केस फक्त ‘हिट अॅण्ड रन’ची नाही. पुण्यासारखे सांस्कृतिक शहर कसे विकृतीकडे चालले आहे हेच या घटनेने पुन्हा दाखवले आहे. वेदांत अग्रवाल हा 17 वर्षांचा आहे, असे सांगितले गेले. 19 मे रोजी पुण्यातील एका बारमध्ये जाऊन त्याने भरपूर दारू ढोसली. त्याच अवस्थेत, झोकांड्या खात त्याने बापाची पोर्शे गाडी चालवली. कल्याणी नगर भागात त्याने अनिश आणि अश्विनी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते दोघे जागीच ठार झाले. गंभीर गोष्ट ही की, वेदांत अग्रवाल याच्या या कारला नंबरप्लेट तर नव्हतीच, पण हा मद्यधुंद मुलगा (वय 17) अल्पवयीन असल्याचा बहाणा केला गेला आणि त्यास न्यायालयानेदेखील झटपट जामीन देऊन मुक्त केले. पोलिसांनीही जो वैद्यकीय रिपोर्ट न्यायालयासमोर आणला त्यात या तरुणाने दारू वगैरे ढोसली नसल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात अपघाताआधी एका पबमध्ये दारू ढोसत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. त्यामुळे पुणे पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेला वैद्यकीय अहवाल संशयास्पद आहे. आरोपी पहाटे 2.15 च्या सुमारास ताशी 200 कि.मी.पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत होता यास काय म्हणावे! अपघात करून आरोपी पळून जात होता, पण स्थानिकांनी त्याला पकडून ठेवले. मात्र न्यायालयाने त्यास

थातूरमातूर शिक्षा

देऊन सोडून दिले. दोन जणांचे बळी घेतल्यावरही एफआयआरमध्ये ‘बेलेबल सेक्शन्स’ म्हणजे ‘जामीनपात्र’ कलमे लावून पोलिसांनी आरोपीच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला. स्थानिक आमदार सुनील टिंगरे हे दोन बळी घेणाऱया मद्यधुंद आरोपीच्या सुटकेसाठी पोलीस स्टेशनला गेले व त्यांच्या दबावामुळेच एफ.आय.आर. सौम्य करण्यात आला असा आरोप सुरू आहे. पुण्याच्या रस्त्यावरचा हा अमानुष प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला गेला. कारण समस्त पुणेकर त्या तरुण-तरुणीच्या तडफडीने जराही विचलित झाले नाहीत. लोक मुर्दाडासारखे बसून राहिले व कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर मात्र या अन्याय-अत्याचार- दडपशाहीविरुद्ध आवाज उठवत राहिले. दोन जिवांचे बळी घेणारा बेवडा मस्तवाल वेदांत अग्रवाल पुणे पोलिसांना व न्यायालयास साधु-संत वाटला काय? दारू पिऊन बेदरकारपणे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वेदांतला जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातलेल्या अटी विनोदी आहेत. बेवडा आरोपी वेदांत याला पंधरा दिवस ट्रॅफिक पोलिसांबरोबर चौकात उभे राहून काम करावे लागेल, वेदांत अग्रवालला भविष्यात कोठे अपघात झाल्याचे दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल, वेदांतला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागतील, असे न्यायालयाने सुचविले आहे. न्यायालयाची ही शिक्षा म्हणजे मृत तरुण-तरुणी व त्यांच्या नातेवाईकांची क्रूर थट्टाच आहे. मानसोपचार तज्ञांकडून उपचार घेण्याची गरज संबंधित न्यायालय आणि पुणे पोलीस दलास आहे. पोलीस आयुक्तांनी पुण्यात येताच अनेक नामचीन गुंडांची

‘परेड’ काढण्याची नौटंकी

करून प्रसिद्धी मिळवली होती. मी आहे तोपर्यंत गुंडगिरी चालणार नसल्याचा दम त्यांनी भरला होता, पण वेदांत अग्रवाल हा श्रीमंत बेवडा पुण्याच्या रस्त्यावर दोन तरुणांचा बळी घेऊन मोकाट आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या वर्दीला लागलेला हा कलंक आहे. पुण्यात गुंडांचे व ड्रग्ज माफियांचे राज्य सुरू आहे. अजित पवारांसारख्या राजकारण्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी गुंडांच्या टोळ्या पोसल्या आहेत व अजित पवार गटाचे आमदार टिंगरे हेच मस्तवाल वेदांतची वकिली करण्यासाठी सगळ्यात आधी पोलीस स्टेशनला पोहोचले. विशाल अग्रवाल याचे आर्थिक साम्राज्य मोठे आहे व त्या साम्राज्यात अनेक राजकारण्यांची हातमिळवणी आहे. त्यामुळे त्याच्या बेवड्या मुलाने दोन निरपराध्यांना चिरडून मारले याचा साधा ओरखडाही वेदांतच्या राजकीय पोशिंद्यांच्या मनावर उठला नाही. वेदांत अग्रवाल याला वाचवण्याचा प्रयत्न करणारे अमानुष व समाजाचे गुन्हेगार आहेत. अशा गुन्हेगाराच्या बचावाचा आग्रह धरतात ते मनुष्य म्हणून जगण्यास लायक नाहीत. अश्विनीचा मृतदेह पाहून तिच्या आईने रुग्णालयातच हंबरडा फोडला. त्या माऊलीच्या आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंतींना पाझर फुटला, पण पुणेकर थंडपणे हा निर्घृण प्रकार पाहत बसले. आमदार रवींद्र धंगेकरांनी यावर आवाज उठवला. पोलिसांना गदागदा हलवले. आता पोलीस आयुक्त कामाला लागले आहेत. वेदांतला दारू पाजणाऱ्या बार मालकाला अटक केली आहे. कोट्यवधींची पोर्शे गाडी नंबरप्लेटशिवाय बेवड्या मुलाच्या हाती देणारा बिल्डर विशाल अग्रवाल यालाही छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे. हे सगळे असले तरी दोघांना चिरडून मारणाऱ्या वेदांतला तुरुंगात पाठवायलाच हवे. पुणेकरांनो, तुम्हाला त्यासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल!