गेल्या वेळी पराभव दिसू लागताच निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी करून निकालच उधळून टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होता. एका पोर्न स्टारला गुप्तपणे पैसे दिल्याच्या आरोपावरून या महाशयांवर गेल्या वर्षी गजाआड जाण्याची नामुष्कीही ओढवली होती. 2020 मध्ये पराभवानंतर 6 जानेवारी, 2021 रोजी ट्रम्प समर्थकांनी ‘यूएस कॅपिटॉल बिल्डिंग’वर हल्ला केला होता, त्याचे समर्थन ट्रम्प यांनी केले होते. त्याच ट्रम्प यांना अमेरिकन मतदारांनी व्हाईट हाऊसचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडून दिले आहेत. वाचाळवीर, हुकूमशहा, हेकेखोर, एककल्ली आणि उथळ अशी अनेक विशेषणे चिकटलेले ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जानेवारी, 2025 मध्ये शपथ घेतील. लोकशाहीत मतदारांचा कौल अंतिम असतो, हे मान्य केले तरी ट्रम्प यांच्या विजयाची नोंद अमेरिकेच्या राजकीय इतिहासात धक्कादायक अशीच राहील!
अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प बसणार आहेत. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते जानेवारी 2025 मध्ये शपथ घेतील. डेमॉव्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्याशी त्यांची अटीतटीची लढत होईल, असे सांगण्यात येत होते, परंतु मतमोजणीत सुरुवातीपासूनच ट्रम्प यांनी हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी घेतली होती व ती शेवटपर्यंत कायम राहिली. अमेरिकेतील ज्या सात राज्यांचा उल्लेख ‘स्विंग स्टेटस्’ म्हणून केला जातो त्या राज्यांमध्येही कमला हॅरिस यांची जादू फार चालली नाही. कमला हॅरिस यांनी आक्रमक प्रचार केला खरा, परंतु त्यांच्यापेक्षा ट्रम्प महाशयांचे मुद्दे अमेरिकन मतदारांना जास्त भावले, असेच आता म्हणावे लागेल. 2020 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा अखेर ट्रम्प महाशयांनी काढला. त्या वेळी डेमोव्रॅटिक पक्षाच्या जो बायडेन यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. याही वेळी बायडेन आणि ट्रम्प या दोन आजी-माजी राष्ट्राध्यक्षांमध्येच लढत होईल, असेच सुरुवातीला चित्र होते. मात्र जुलै महिन्यात बायडेन महाशयांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा शहाणपणा दाखवला आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून पुढे चाल दिली. अर्थात, बायडेन यांचे हे उशिरा सुचलेले शहाणपण हॅरिस यांच्यासाठी अडचणीचे ठरणार, हे उघड होते. ‘मुखदुर्बल’ बायडेन यांनी तोपर्यंतच्या
प्रचार काळात अनेक चुका
केल्या. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक दौर्बल्याचे जाहीर दर्शन अमेरिकन मतदार आणि जगाला झाले. त्यातून रिपब्लिकन पक्षाची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली. हा खड्डा भरून काढत ट्रम्प यांच्यावर आघाडी घेण्याचे आव्हान कमला हॅरिस यांच्यासमोर होते, पण ते पेलणे त्यांना जमले नाही. त्यात ट्रम्प यांनी त्यांच्यावरील जीवघेणा हल्ला आणि त्यात त्यांचे थोडक्यात बचावणे याचा व्यवस्थित राजकीय लाभ घेतला. ट्रम्प यांनी जो स्थलांतरितांचा मुद्दा तापविला तो हॅरिस आणि त्यांचा पक्ष प्रभावीपणे थंड करू शकला नाही. स्वतः कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या म्हणजे ‘स्थलांतरित’च ही प्रतिमाही कदाचित हॅरिस यांना आडवी आली. भूमिपुत्र आणि त्यांचे हक्क, त्यावर बाहेरून आलेल्यांची गदा असे भावनिक मुद्दे ट्रम्प यांच्या पथ्यावर पडले. अमेरिकेतल्या महागाईच्या वणव्याची धगही सत्तारूढ कमला हॅरिस यांना सोसावी लागली. वास्तविक कमला हॅरिस जिंकल्या असत्या तर अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष हा बहुमान त्यांना मिळाला असता, परंतु तसे घडले नाही. हिलरी क्लिंटन यांनी 2016 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनाच कडवी झुंज दिली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता 2024 मध्ये कमला हॅरिस यांनाही त्याच ट्रम्प यांनी पराभूत केले. अमेरिकन लोकशाही आणि तेथील मतदार यांना
प्रगल्भ वगैरे
म्हटले जाते, परंतु वाचाळवीर म्हणून ज्या ट्रम्प यांची पहिल्या कार्यकाळात अमेरिकन जनतेनेच संभावना केली होती, त्याच ट्रम्प यांना त्याच जनतेने राष्ट्राध्यक्षपदाची माळ बहुमतासह घातली आहे. गेल्या वेळी पराभव दिसू लागताच निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी करून निकालच उधळून टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होता. एका पोर्न स्टारला गुप्तपणे पैसे दिल्याच्या आरोपावरून या महाशयांवर गेल्या वर्षी गजाआड जाण्याची नामुष्कीही ओढवली होती. 2020 मध्ये पराभवानंतर 6 जानेवारी, 2021 रोजी ट्रम्प समर्थकांनी ‘यूएस कॅपिटॉल बिल्डिंग’वर हल्ला केला होता, त्याचे समर्थन ट्रम्प यांनी केले होते. एवढेच नव्हे तर त्याप्रकरणी अटक झालेल्यांना आपण निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी ‘मुक्त’ करू असे जाहीर आश्वासनही ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान दिले होते. त्याच ट्रम्प यांना अमेरिकन मतदारांनी व्हाईट हाऊसचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडून दिले आहेत. वाचाळवीर, हुकूमशहा, हेकेखोर, एककल्ली आणि उथळ अशी अनेक विशेषणे चिकटलेले ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जानेवारी, 2025 मध्ये शपथ घेतील. लोकशाहीत मतदारांचा कौल अंतिम असतो, हे मान्य केले तरी ट्रम्प यांच्या विजयाची नोंद अमेरिकेच्या राजकीय इतिहासात धक्कादायक अशीच राहील!