सामना अग्रलेख – लडाखच्या भूमीवर गांधी!

चीनचे लष्करी सामर्थ्य हिंदुस्थानच्या तुलनेत प्रचंड आहे. पंतप्रधान मोदी यांनी चिनी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत आणून कितीहीझोकेदिले तरीभाई भाईकिंवामैत्रीअशा भाकड कथांवर चीन विश्वास ठेवत नाही. चीनने लडाखमध्ये घुसखोरी केलीच आहे अनेकदा चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश दाखवून आपल्याला डिवचले जाते. मोदींसारखासुपरमॅनपंतप्रधान आपल्याला लाभला असताना चीनने हिंदुस्थानच्या बाबतीत अशी वाकडी पावले टाकावीत हे मोदी भक्तांना मान्य होणार नाही. लडाखच्या भूमीवर राहुल गांधी आहेत. त्यांनी चिनी घुसखोरीचे सत्य मांडले. भाजपास ते मान्य नसेल तर नेमके सत्य काय ते त्यांनी पुराव्यासह मांडावे!

श्री. राहुल गांधी सध्या लेह आणि लडाखच्या दौऱ्यावर आहेत व तेथील जनतेने राहुल गांधी यांच्या दौऱ्यास उदंड प्रतिसाद दिला आहे. लडाखच्या सीमेवरून चीन सतत धडका मारीत आहे.  गेल्या पाच-सहा वर्षांत चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी करून जमीन बळकावली आहे. अनेक ठिकाणी चिनी व हिंदुस्थानी सैनिकांत संघर्ष झाला, पण पंतप्रधान मोदी हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत. लडाखची इंचभरही जमीन गमावलेली नाही असा दावा पंतप्रधान मोदी करतात, पण मोदी सपशेल खोटे बोलत आहेत व चीनने आपल्या भूभागावर अतिक्रमण केले असल्याचे सत्य राहुल गांधी यांनी मांडले आहे. चीनने हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी केलीच आहे. गायरान जमिनी चीनने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे इंचभरही जमीन गमावली नाही हा पंतप्रधान मोदींचा दावा खोटा असल्याचे राहुल गांधी यांनी लडाखच्या भूमीवरून स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत सत्य मांडल्याने भारतीय जनता पक्षाने टीका सुरू केली व पुन्हा एकदा मोदी भक्त भूतकाळातले खड्डे नव्याने उकरू लागले. भाजपच्या मते राहुल गांधी हे देशाचा अपमान करीत आहेत. चीनने घुसखोरी केली काय? असा प्रश्न विचारल्याने देशाचा कोणता व कसा अपमान झाला? हे भाजप प्रवक्त्यांना सांगता येईल काय? राहुल गांधी स्वतः मोटरसायकल चालवीत लेहवरून लडाखला गेले. हा रस्ता दुर्गम व धोक्याचा आहे. राहुल गांधींचे हे साहस एखाद्या वीर जवानाप्रमाणे आहे. तेथून ते पेन्गाँगला पोहोचले व नुबरा, कारगील येथेही गेले. हे सर्व करण्यामागे राहुल गांधी यांची

देशभक्तीच

आहे. देशभक्तीचा मक्ता भाजपनेच घेतलेला नाही. सत्य जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासा आहे. राहुल गांधींवर टीका करताना भाजपचे नेते म्हणतात, ‘‘हिंदी चिनी भाई भाई’ या घोषणा कोणी दिल्या होत्या? नेहरूंच्या काळातच चीनने 45 हजार चौरस किलोमीटर जमीन घशात घातली.’’ प्रश्न वर्तमानकाळातला आहे व भाजपवाले नेहमीप्रमाणे भूतकाळाच्या अंधाऱ्या गुहेत शिरत आहेत. पंतप्रधान मोदींची 56 इंचाची छाती असताना चीन आत घुसला व त्याने आपल्या अनेक चौक्या ताब्यात घेतल्या. पूर्व लडाख सीमेवर पेन्गाँग परिसरात 5 मे 2020 रोजी चीन व हिंदुस्थानी लष्करात हिंसक संघर्ष झाला होता व त्यात आपल्या 20 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. हे का घडले, याचा हिशेब जनता मागत आहे. ‘हिंदी चिनी भाई भाई’ला भाजपचा विरोध तकलादू आहे. कारण मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी चीनबरोबरचे संबंध सुधारायला हवेत यावर भर दिला. चीनच्या राष्ट्राध्यक्षांना ते वरचेवर अहमदाबादला बोलावून शेव, ढोकळा, खाकरा यांची मेजवानी देतात. मोदींबरोबर चिनी राष्ट्रपती झोपाळय़ावर बसून मौज करतात. ‘हिंदी चिनी भाई भाई’ हा नेहरूंचा संदेश मोदींनी मान्य केल्याचेच हे लक्षण मानायला हवे. चीनने घुसखोरी केली म्हणून हिंदुस्थानी सैन्यास चीनवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचे आदेश मोदी यांनी दिलेले नाहीत. आपल्या राष्ट्राच्या मानखंडनेची नेमकी जबाबदारी कोणावर येते हे जाणून घ्यायचा लोकशाहीत नागरिकांना

अधिकार

असतो. देशाच्या सीमांचे रक्षण करणे हे लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचे कामच आहे. सरकारने आपल्या बऱ्यावाईट कृत्यांचा जाब लोकांपुढे दिलाच पाहिजे; परंतु जेव्हा सरकार तसे करण्यास नकार देते तेव्हा कोणीतरी ही जबाबदारी पार पाडावी लागते. 1962 मधल्या आपल्या राष्ट्रीय मानहानीचा गुन्हा कुणाच्या हातून घडला हे जाणून घेण्याचा अधिकार भाजपास आहेच, पण मग 5 मे 2020 रोजी मोदी काळात चीन लडाखमधून किती आत आपल्या हद्दीत घुसला व त्याने नक्की काय बळकावले, देशाचे संरक्षण खाते तेव्हा काय करीत होते, हे जाणून घेण्याचा अधिकार आपल्या सगळय़ांनादेखील आहे. राहुल गांधी यांनी लडाखच्या भूमीवर जाऊन तेच केले आहे. चीनने लडाखच्या सीमेवर रस्ते, पूल बांधले आहेत. लष्करी ठाणी, विमानतळांची योजना केली आहे. चीनचे लष्करी सामर्थ्य हिंदुस्थानच्या तुलनेत प्रचंड आहे. पंतप्रधान मोदी यांनी चिनी राष्ट्राध्यक्षांना  अहमदाबादेत आणून कितीही ‘झोके’ दिले तरी ‘भाई भाई’ किंवा ‘मैत्री’ अशा भाकड कथांवर चीन विश्वास ठेवत नाही. चीनने लडाखमध्ये घुसखोरी केलीच आहे व अनेकदा चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश दाखवून आपल्याला डिवचले जाते. मोदींसारखा ‘सुपरमॅन’ पंतप्रधान आपल्याला लाभला असताना चीनने हिंदुस्थानच्या बाबतीत अशी वाकडी पावले टाकावीत हे मोदी भक्तांना मान्य होणार नाही. लडाखच्या भूमीवर राहुल गांधी आहेत. त्यांनी चिनी घुसखोरीचे सत्य मांडले. भाजपास ते मान्य नसेल तर नेमके सत्य काय ते त्यांनी पुराव्यासह मांडावे!