सामना अग्रलेख – ‘झिका’चे संकट!

आधीच राज्यात डेंग्यूच्या साथीने धुमाकूळ घातला आहे. 23 जिल्हय़ांमध्ये दोन हजारांहून अधिक डेंग्यूचे रुग्ण गेल्या दीडेक महिन्यात आढळले. मलेरियाची साथही आहेच. त्यात आता पुण्यात आढळलेल्या झिका व्हायरसचे नवे संकट महाराष्ट्रावर आले आहे. येत्या तीन दिवसांत आषाढी वारीचे पालखी सोहळे पुण्यात होणार आहेत. वारीच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीच्या तोंडावरच पुण्यात आढळलेला झिका व्हायरस वारीबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरू नये, याची खबरदारी आरोग्य यंत्रणांनी घ्यायलाच हवी!

महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्हय़ांत डेंग्यूने थैमान घातलेले असतानाच पुण्यातून आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ‘झिका’ या धोकादायक व्हायरसची लागण झालेले तीन रुग्ण पुण्यात आढळले आहेत. एक तर या झिका व्हायरसने ऐन पावसाळय़ात डोके वर काढले आहे व दुसरी काळजीची बाब म्हणजे झिकाबाधित रुग्णांच्या संसर्गाचे मूळ वा साखळी अद्याप आरोग्य यंत्रणेला सापडलेली नाही. झिका व्हायरसचे रुग्ण पुण्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी यापूर्वी जेव्हा जेव्हा पुण्यात हे रुग्ण सापडले त्या त्या वेळी संबंधित रुग्णांनी कुठे ना कुठे प्रवास केला होता. मात्र या वेळी तसे घडलेले नाही. कोथरुडच्या एरंडवणे भागातील एक डॉक्टर व त्यांची 13 वर्षांची मुलगी या दोघांमध्ये झिका व्हायरसची लक्षणे आढळली. वैद्यकीय तपासणी व रक्त परीक्षण अहवालातून हा झिका व्हायरसच असल्याचे निष्पन्न झाले. देशाबाहेर अथवा राज्याबाहेर कुठेही प्रवास केलेला नसताना या दोघांनाही या व्हायरसची लागण कशी झाली, या प्रश्नामुळे आरोग्य यंत्रणा चक्रावून गेल्या आहेत. प्रामुख्याने आफ्रिका, आग्नेय आशिया, अमेरिका व हिंदुस्थानच्या दक्षिण भागांत आढळणारा झिका व्हायरस आता पुण्यातच मुक्कामी आला असेल तर ते चिंताजनक म्हणावे लागेल. कोथरुडपाठोपाठ मुंढवा येथील कोद्रेवस्ती परिसरातही झिकाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. एका 47 वर्षीय महिलेला

वारंवार ताप

येत असल्याने व औषधी घेऊनही तो कमी होत नसल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोथरुडप्रमाणेच येथेही डॉक्टरांनी तिची झिकाशी संबंधित चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अर्थात सततचा ताप व जागरुकपणा दाखवून केलेली चाचणी यामुळे या तिघांनाही झिका व्हायरसची लागण झाल्याचे उघडकीस आले. ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे, सांधे व स्नायुदुखी, अंगावर पुरळ, थकवा ही डेंग्यूप्रमाणेच दिसणारी लक्षणे झिकाबाधित रुग्णांतही दिसतात. ताप व अन्य लक्षणांचे पुणे व परिसरात आजमितीस किती रुग्ण आहेत व आवश्यक त्या चाचण्या न केल्यामुळे किती रुग्णांचा झिका व्हायरस पडद्याआड आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. कारण ऋतू बदलला की, ताप व अंगदुखीसारखे व्हायरल प्रकार होतातच, असे समजून बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र चाचण्यांअभावी दुर्लक्षित राहिलेला झिका व्हायरस हा त्या कुटुंबासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. झिका व्हायरस हा प्राणघातक नसला तरी कुटुंबात जर एखादी गर्भवती स्त्री असेल तर तिच्यासाठी मात्र हा व्हायरस घातक ठरू शकतो. गर्भवती महिलेला जर झिकाचा संसर्ग झाला तर तो व्हायरस पोटातील बाळापर्यंत पसरतो व त्यामुळे गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूती होण्याचा धोका असतो. याशिवाय बाळाच्या मेंदूत गंभीर विकृती, डोक्याचा घेर कमी होणे व

इतर जन्मदोष

निर्माण होण्याची भीती असते. झिका हा फ्लॅवी व्हायरस वंशातील विषाणू सर्वप्रथम युगांडाच्या झिका या जंगलात 1947 मध्ये आढळला. त्यामुळे त्याला झिका हे नाव पडले. 1950 ते 2016 पर्यंत आफ्रिका, आशियाचा विषुववृतीय प्रदेश असा प्रवास करून हा विषाणू पूर्वेकडे प्रशांत महासागर ओलांडून अमेरिकेपर्यंत पसरला. एडीस इजिप्ती या डासांपासून व रुग्णांसोबतच्या लैंगिक संबंधांतूनही झिका व्हायरसचा प्रसार होतो. एडीस इजिप्ती या डासांची पैदास साचलेल्या पाण्यात मोठय़ा प्रमाणावर होते. झिका व्हायरसमुळे मृत्यूचे प्रमाण नगण्य असले तरी याचा अधिक प्रसार झाला तर गर्भवती महिलांसाठी व त्यांच्या पोटातील बाळांसाठी तो अत्यंत घातक ठरू शकतो. आधीच राज्यात डेंग्यूच्या साथीने धुमाकूळ घातला आहे. 23 जिल्हय़ांमध्ये दोन हजारांहून अधिक डेंग्यूचे रुग्ण गेल्या दीडेक महिन्यात आढळले. मलेरियाची साथही आहेच. त्यात आता पुण्यात आढळलेल्या झिका व्हायरसचे नवे संकट महाराष्ट्रावर आले आहे. येत्या तीन दिवसांत आषाढी वारीचे पालखी सोहळे पुण्यात होणार आहेत. वारीच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीच्या तेंडावरच पुण्यात आढळलेला झिका व्हायरस वारीबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरू नये, याची खबरदारी आरोग्य यंत्रणांनी घ्यायलाच हवी!