सामना अग्रलेख – स्वयंप्रभूंचा मनरोग!

मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो? त्यांना मनाचा आजार म्हणजे मनरोग बळावला आहे. ऐसा कोई सगा नही, जिसको मोदी ने ठगा नही. त्यामुळे स्वयंप्रभू अवस्थेला पोहोचूनही मोदी एकाकी आहेत. मनाने ते कमजोर पडले आहेत. कमजोर मनाच्या व्यक्तीलाच विचित्र भास होतात. स्वतःविषयी भ्रामक कल्पना मनात आकार घेतात. मोदी यांचा अविनाश हा त्यातलाच प्रकार आहे. 4 जूननंतर भाजप शिल्लक राहिलाच तर मोदींच्या मन-आजाराची त्यांना काळजी घ्यावीच लागेल. निदान पतंजलीच्या रामदेवबाबाने तरी स्वयंप्रभूने केलेल्या उपकारांची जाण ठेवून पुढे यायला हवे, पण शेवटी… ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, तू सत्तेवरून जाता… राहील कार्य काय?’ हीच अवस्था स्वयंप्रभूंची होईल!

निवडणुका संपताच नरेंद्र मोदी यांच्यावर उपचार करून घेणे गरजेचे आहे. मोदी हे वयाच्या पंचाहत्तरीकडे झुकले आहेत. ते 20 तास काम करतात. म्हणजे झोपत नाहीत. खाण्यापिण्यातही त्यांना रस नाही. त्याचा परिणाम त्यांच्या मनावर व शरीरावर होताना स्पष्ट दिसत आहे. गोदी मीडियातील चमचे काहीही बोलोत, पण मोदी यांच्यावर प्रचंड ताण आहे व भाजप त्यांचा वापर तुटेपर्यंत करत आहे. मोदी यांना चांगल्या डॉक्टरची, मानसोपचार तज्ञाची गरज आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, ‘‘मैं तो ‘अविनाशी’ हूं. मैं काशी का हूं.’’ भगवान शंकरास अविनाशी म्हटले जाते. ज्याचा कधीच विनाश होत नाही असा तो अविनाशी. मोदी यांनी स्वतःला स्वयंप्रभू शिवशंकर म्हणून जाहीर करून टाकले. हे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचेच लक्षण आहे. स्वयंप्रभूंनी एका प्रचार प्रवचनात प्रजेला सांगितले की, ‘‘मी 85 कोटी जनतेला फुकट धान्य देतो. त्यामुळे तुम्ही मला मते द्या. नाहीतर तुम्हाला पाप लागेल.’’ मोदी यांची ही विधाने म्हणजे देववाणी असल्याचे त्यांच्या भक्तांना वाटत असेल तर भक्तांनीही आपापली डोकी तपासून घेतली पाहिजेत. मनाचा आजार बरा नाही. शरीराचा आजार बरा होऊ शकतो. मनाचा आजार बरा होत नाही. त्यामुळे आम्हाला स्वयंप्रभू व त्यांच्या भक्तांची चिंता वाटते. प्रभूंच्या गुजरातेतील राजकोट येथे एका मॉलमधील गेम झोनला आग लागली. त्या आगीत 26 तरुण व 12 लहान मुले जळून खाक झाली. आगीत सापडलेले हे जीव स्वयंप्रभू मोदींचा धावा करीत होते. मोदी हेच गुजरातसाठी देव असल्याने तेथील लोक संकटकाळात त्यांचाच धावा करणार, पण भक्त आगीत खाक होत असताना स्वयंप्रभू मोदी यांनी त्यांच्यातील शक्तीचा वापर करून भक्तांचे प्राण वाचवले नाहीत. याबद्दल स्वयंप्रभूंनाही पाप लागू शकते, पण हे देवाचे अवतार असल्याने पाप-पुण्याच्या रेषा पार करून ते सिंहासनावर बसले आहेत. स्वयंप्रभू गरीबांना फुकट धान्य देतात व त्या बदल्यात ते

मतांची वसुली

करतात. भगवान कृष्ण पिंवा श्रीराम हे त्यांच्या त्रेतायुगात गरीब प्रजेला फुकटात धान्य देऊन त्यांच्या सिंहासनास संरक्षण मागत होते काय? राम-कृष्ण हे निवडणुका लढवून, निवडणुकांत हेराफेरी करून, लोकांना मूर्ख बनवून देवत्वास प्राप्त झाले होते काय? यावर नव्याने संशोधन करणे गरजेचे आहे. कारण मोदी हे फक्त देव नसून ‘देवांचा देव महादेव’ असल्याचे त्यांनी जाहीर केले. तत्त्वचिंतक, विचारवंत रजनीश किंवा ‘ओशो’ यांनीही स्वतःला ‘भगवान’ म्हणून जाहीर करून टाकले व रजनीश यांचे भक्त आजही त्यांना ‘भगवान रजनीश’ म्हणून संबोधतात. त्यामुळे मोदी यांना यापुढे ‘ओशों’प्रमाणे ‘भगवान मोदी’ असेच संबोधायला हवं. 4 जूननंतर भगवान महोदयांचा पराभव होईल. त्यानंतर त्यांना ‘माजी भगवान’ असे उल्लेखावे लागेल. भगवान मोदी यांनी भाषणात आधी मंगळसूत्र आणले व जाता जाता ‘मुजरा’ आणला. इंडिया आघाडी अल्पसंख्याकांच्या कोठ्यावर मुजरा करीत आहे, असे तारे त्यांनी तोडले. देवाच्या दरबारात अप्सरा, रंभा, मेनका, उर्वशी या देव मंडळाचे मन रिझविण्यासाठी नृत्य वगैरे करतात हे माहीत होते. तशा पुराणातील स्वर्गकथा आहेत, पण स्वयंप्रभूंना नृत्याची आवड नसून मुजरा बरा वाटतो असे एकंदरीत दिसते. इंडिया आघाडी सत्तेवर येताच मुसलमानांना आरक्षण देईल. त्यामुळे हिंदूंनी स्वयंप्रभूंना मते द्यावीत असे त्यांनी जाहीर केले. स्वयंप्रभू जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा 70 मुस्लिम जातींना त्यांनी ओबीसीमध्ये आरक्षण दिले होते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खणखणीतपणे सांगितले की, आम्ही 52 मुस्लिम जातींना ‘ओबीसी’ वर्गात आरक्षण दिले. याचा अर्थ असा घ्यायचा की, स्वयंप्रभू मोदी व त्यांचे भक्त देवेंद्र हे ‘मुजरा’ करीत होते. स्वयंप्रभू म्हणतात, ‘‘मी बायोलॉजिकल नाही. म्हणजे आईच्या उदरातून माझा जन्म झाला नाही. मला तर वरून परमात्म्याने पाठवले.

मी देवाची देणगी

आहे.’’ यावर या स्वयंप्रभूंचे चमचे, ‘‘वाह…वाह…वाह…’’ करीत टाळय़ा वाजवतात व ‘‘प्रभू की जय हो’’ म्हणतात. यावर राहुल गांधी यांनी जाहीर सभेत स्वयंप्रभूंना एक नाजूक प्रश्न विचारला आहे, ‘‘आपल्याला आपण देव असल्याचे भास नक्की कधी होतात? म्हणजे सकाळी होतात, संध्याकाळी होतात की, झोपेत म्हणजे स्वप्नावस्थेत होतात?’’ राहुल गांधी हे स्वयंप्रभू मोदींची ही अशी खिल्ली उडवतात. राहुल गांधी यांनी मोदींचा अक्षरशः ‘पप्पू’ केला व मोदी हे या निवडणुकीत ‘पप्पू’ अवस्थेत पोहोचले. हीच ‘पप्पू’ अवस्था अविनाशी आहे. मोदी हे अविनाशी अवस्थेला पोहोचले आहेत ते असे. मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो? त्यांना मनाचा आजार म्हणजे मनरोग बळावला आहे. त्यांना विश्रांती व उपचारांची गरज आहे. मोदी यांना घरसंसार, नातीगोती असे काहीच नसल्याने या वयात व मानसिक अवस्थेत काळजी घ्यायची कोणी? ऐसा कोई सगा नही, जिसको मोदी ने ठगा नही. त्यामुळे स्वयंप्रभू अवस्थेला पोहोचूनही मोदी एकाकी आहेत. मनाने ते कमजोर पडले आहेत. कमजोर मनाच्या व्यक्तीलाच विचित्र भास होतात. स्वतःविषयी भ्रामक कल्पना मनात आकार घेतात. मोदी यांचा अविनाश हा त्यातलाच प्रकार आहे. 4 जूननंतर भाजप शिल्लक राहिलाच तर मोदींच्या मन-आजाराची त्यांना काळजी घ्यावीच लागेल. निदान पतंजलीच्या रामदेवबाबाने तरी स्वयंप्रभूने केलेल्या उपकारांची जाण ठेवून पुढे यायला हवे, पण शेवटी…
‘जन पळभर म्हणतील हाय हाय,
तू सत्तेवरून जाता…
राहील कार्य काय?’
हीच अवस्था स्वयंप्रभूंची होईल!