सामना अग्रलेख – गडचिरोलीतले वास्तव, बहिणीच्या खांद्यावर मुलांची प्रेते

विदर्भातील गडचिरोलीत मुलांचे मृतदेह खांद्यावर टाकून आई-बाप जात आहेत व त्याच वेळी विदर्भातील भाजपचाच एक आमदार नर्तकीबरोबर ‘ठुमके’ घेत बेभान नाचताना दिसत आहे. इतके निर्घृण लोक ज्या सत्तेत आहेत त्यांच्या राज्यात निरपराध्यांचे जगणे हे किड्या-मुंग्यांसारखेच ठरते. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांवर भ्रष्टाचार व कमिशनबाजीचे वारंवार आरोप होत आहेत आणि मुख्यमंत्री त्यांच्या या लाडक्या मंत्र्यांना पाठीशी घालण्यात दंग आहेत. आई-बापांना त्यांच्या लेकरांचे मृतदेह खांद्यावर टाकून पायपीट करण्याची वेळ येत आहे. गडचिरोलीतले हे वास्तव भयंकर आहे.

महाराष्ट्र राज्य कसे अधोगतीला लागले आहे ते आता रोजच उघड होत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींना मासिक 1500 रुपयांची योजना जाहीर करताच ‘आता आपण जिंकलोच. राज्यातील सगळ्या बहिणी 1500 च्या बदल्यात बेइमान सरकारलाच मतदान करतील,’ या भ्रमात सरकारकर्ते आहेत. कर्जबाजारी राज्याचा सर्व निधी ‘लाडकी’ योजनेत वळवून सरकारने शिक्षण, आरोग्य खात्याचा गळा घोटला व हे चित्र भयंकर आहे. आपल्या दोन लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून वाट काढीत चाललेल्या गरीब दांपत्याचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील हे चित्र आहे. मिंधे यांचे सरकार काय लायकीचे आहे व या राजवटीत जनता किती त्रस्त आहे ते गडचिरोली घटनेवरून दिसते. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. सरकारी आरोग्य व्यवस्थेत उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. रुग्णालयातून मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. शेवटी माता-पित्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर टाकून 15 किलोमीटर चिखल तुडवत अहेरीचे पत्तीगाव गाठले. गडचिरोलीत हे घडले. मात्र ते राज्यातील अनेक आदिवासी पाडे, वाड्यावस्त्यांवर घडत आहे. महाराष्ट्राचे हे चित्र मुख्यमंत्री व त्यांच्या टोळीला विचलित करीत नाही काय? गेल्या अनेक वर्षांपासून

सध्याचे मुख्यमंत्री

गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी गडचिरोलीत नेमके काय कार्य केले? गडचिरोलीतील खाण उद्योगाचे मोठे साम्राज्य व त्यातून होणाऱ्या ‘खोके’ व्यवहारांवर नियंत्रण राहावे यासाठीच गडचिरोली त्यांना हवे आहे. बाकी मग मुलांची प्रेते खांद्यावर ठेवून लाडकी बहीण चिखल तुडवते याकडे त्यांचे लक्ष नाही. राज्याच्या चवचाल आरोग्य मंत्र्यांची तत्काळ हकालपट्टी करावी असे हे प्रकरण आहे. आरोग्य खात्यात इतका भ्रष्टाचार, अनागोंदी माजली आहे की, आरोग्य मंत्र्यांचे नाव कानावर पडताच आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचाऱयांना उलटय़ा होतात. डॉक्टर, नर्सेस यांच्या बदल्या-बढत्यांत मंत्री पैसे खातात, सरकारी रुग्णालयांमधील औषधांचा तुटवडा आणि बेपर्वाईमुळे गेल्या वर्षी संभाजीनगर, नांदेड येथे दोन दिवसांत 20 बालकांसह 50 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघातही भूम येथील ग्रामीण रुग्णालयात वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने 14 महिन्यांच्या बालिकेचा तडफडून मृत्यू झाला होता. राज्याच्या आरोग्य खात्याचे हे असे भीषण चित्र असेल तर गडचिरोलीतील दोन मुलांच्या मृत्यूस फक्त आरोग्य मंत्र्यांनाच जबाबदार धरावे लागेल. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील कळवा येथील सरकारी रुग्णालयात अवघ्या एका महिन्यात 21 नवजात बाळांचा मृत्यू झाल्याचा

धक्कादायक प्रकार

गेल्या वर्षी उघड झाला होता. ठाणे जिल्ह्यातीलच अनेक आदिवासी पाड्यांवर रस्ते नाहीत. सरकारी रुग्णालये नाहीत. गर्भवतींना डोलीत बसवून गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी न्यावे लागते. या प्रवासात अनेकदा बाळ-बाळंतिणीस प्राण गमवावे लागले आहेत. खोकेबाज सरकारच्या काळात अशा अनेक लाडक्या बहिणींचे आणि त्यांच्या बाळांचे प्राण गेले. या लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या 1500 रुपये जमा झाले तरी त्यांच्या जीवनाचे हे दशावतार संपणार नाहीत. महाराष्ट्र राज्य सध्या ठेकेदारांच्या खिशात आहे व ही ठेकेदारी आरोग्य खात्यातही आहे. संवेदना नसलेले राज्यकर्ते छातीवर बसल्यावर दुसरे काय व्हायचे? विदर्भातील गडचिरोलीत मुलांचे मृतदेह खांद्यावर टाकून आई-बाप जात आहेत व त्याच वेळी विदर्भातील भाजपचाच एक आमदार नर्तकीबरोबर ‘ठुमके’ घेत बेभान नाचताना दिसत आहे. इतके निर्घृण लोक ज्या सत्तेत आहेत त्यांच्या राज्यात निरपराध्यांचे जगणे हे किड्या-मुंग्यांसारखेच ठरते. आरोग्य व्यवस्थेचे बारा वाजलेच आहेत व त्यावर ‘लाडकी बहीण’ योजना हा उतारा नाही. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांवर भ्रष्टाचार व कमिशनबाजीचे वारंवार आरोप होत आहेत आणि मुख्यमंत्री त्यांच्या या लाडक्या मंत्र्यांना पाठीशी घालण्यात दंग आहेत. लाडक्या बहिणी आणि त्यांची बालके मात्र आरोग्य सुविधांअभावी हकनाक जीव गमावत आहेत. आई-बापांना त्यांच्या लेकरांचे मृतदेह खांद्यावर टाकून पायपीट करण्याची वेळ येत आहे. गडचिरोलीतले हे वास्तव भयंकर आहे.