सामना अग्रलेख – एका शिंद्याचे एन्काऊंटर!

महाराष्ट्राच्या बाबतीत सध्या जे घडवले जात आहे ते भयंकर आहे. राज्यात जसे लिंगपिसाट आहेत तसे सत्तापिसाटही आहेत. लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट खोक्यांवर उभे राहून सरन्यायाधीशांशी हास्यविनोद करतात. कायद्याची भीती राहिलेली नाही व न्यायदेवता खोकेबाजांची बटीक बनली आहे. महाराष्ट्रातील एकूणच माहोल विद्यमान सत्ताकाळात बिघडला आहे. जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीसांच्या खुर्चीखाली वात पेटवली आहे. जनता त्रस्त आहे. जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून विचलित करण्यासाठी बदलापूरच्या आरोपीस गोळ्या घातल्या, पण गृहमंत्र्यांचे संरक्षण असलेले सूत्रधार आपटे, कोतवाल, आठवले मात्र मोकळेच राहिले!

सरन्यायाधीश चंद्रचूड हे मुंबईत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांबरोबर चहापान करीत असतानाच बदलापूर बलात्कार कांडातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत मारला गेल्याचे वृत्त आले. त्याआधी या शिंदेने पोलिसांच्या हातातले शस्त्र हिसकावून आत्महत्या केली असे सांगण्यात आले, पण लगेच पटकथेत बदल केला व शिंदेला पोलिसांनी मारले. त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी शिंदेला मारले, असा रहस्यमय सिनेमा पडद्यावर आला. बलात्कार कांडातील आरोपींना अशाच प्रकारची कठोर शिक्षा व्हायला हवी. खटलेबाजी, तारखांवर तारखा, फास्ट ट्रकची नाटके या घोळात न अडकता महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा झटपट न्याय व्हायलाच हवा. बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींच्या बाबतीत जे घडले, त्यामुळे देश हादरला. पीडित मुलींच्या आईंची तक्रार घ्यायला बदलापूरचे पोलीस तयार नव्हते. जनता रस्त्यावर उतरली, रेल्वे बंद केली, मंत्र्यांना अडवले तेव्हा कोठे ‘वर्षा’वरील शिंद्यांनी बलात्कारी शिंदेवर कारवाई केली. आरोपीला आमच्या हातात द्या, आम्हीच त्याला फासावर लटकवतो, अशी मागणी आंदोलकांची होती. मिंधे सरकारने अशा शेकडो आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले. त्यांना अटक करून त्यांची धिंड काढली. आंदोलकांच्या घरात पोलीस घुसवले. आता पोलिसांनी अक्षय शिंदेला न्यायालयीन कोठडीतून बाहेर काढून चकमकीत उडवले आहे. जर अक्षय शिंदेचा अशा प्रकारे न्याय केला असेल तर तीच मागणी करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे का दाखल केले? कुणालाही

कायदा हातात

घेऊ देणार नाही असे शिंदे-फडणवीस तेव्हा का बोंबलत होते? त्यामुळे बदलापुरातील सर्व आंदोलकांवरील गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यायला हवेत. अक्षय शिंदेंचे ‘एन्काऊंटर’ करून आपण बदलापूरच्या अत्याचार पीडितांना ‘झटपट न्याय’ दिला असे मिंधे-फडणवीस यांना भासवायचे आहे का? तसे असेल तर मग तीन पुजाऱयांच्या निर्घृण अत्याचाराला बळी पडलेल्या ठाणे जिल्ह्यातीलच अक्षता म्हात्रेलादेखील ‘झटपट न्याय’ द्यावा, असे मिंधे-फडणवीस यांना का सुचले नाही? खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत 200 पेक्षा जास्त भगिनींवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या भगिनींनादेखील अशाच ‘न्याया’ची अपेक्षा आहे. तेव्हा बदलापूर प्रकरणातील एखादे ‘एन्काऊंटर’ म्हणजे न्याय असे समजणे धूळफेक ठरेल. मुळात अक्षयची ‘चकमक’ वगैरे नेहमीप्रमाणे संशयास्पद आहे. गृहमंत्री फडणवीस व त्यांच्या मिंध्यांना या बलात्कार कांडातील मुख्य सूत्रधारांना वाचवायचे आहे. ज्या शैक्षणिक संस्थेत हे अधम कृत्य घडले त्या शाळेचे संचालक आपटे, कोतवाल वगैरे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. अक्षय शिंदे याने त्याच्या जबानीत नक्की काय सांगितले व त्यातले किती पोलिसी कागदावर आले हे गुलदस्त्यात आहे. पुन्हा या शाळेतील महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेले आहे आणि ते काही अक्षय शिंदेने केले नाही. त्यामुळे शिंदे याच्यामागचे सूत्रधार या सरकारने सुरक्षित केले. पुढे जनतेच्या दबावानंतर संस्था चालक, कर्मचारी यांच्यावर ‘पोक्सो’ कायद्याखाली गुन्हे दाखल झाले, मात्र त्यांना

फडणवीस-शिंदे कृपेने

अटक झाली नाही. त्यांना अटक झाली असती ती अक्षय शिंदेच्या जबानीवर. आता त्या अक्षय शिंदेलाच ठार करून आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचविण्यात आले. हे आपल्या राज्यातील कायद्याचे धिंडवडे आहेत. हे धिंडवडे निघत असताना सरन्यायाधीश चंद्रचूड हे घटनाबाह्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबर हास्यविनोद करतानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेचा खटला याच सरन्यायाधीशांसमोर सुरू आहे. शिवसेना व धनुष्यबाण कोणाचे? याचा निकालही सरन्यायाधीश चंद्रचूड यांना द्यायचा आहे. तीन वर्षे ते यावर खल करीत आहेत व तारखांचा घोळ घालीत आहेत. ज्यांच्या विरोधात हा खटला आहे ते पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी मोदकाचा प्रसाद घेण्यासाठी येतात व या खटल्यातील मुख्य आरोपी एकनाथ शिंदे व अजित पवारांबरोबर हास्यविनोद करताना आमचे सरन्यायाधीश दिसतात तेव्हा डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेची चिंता वाटते. महाराष्ट्राच्या बाबतीत सध्या जे घडवले जात आहे ते भयंकर आहे. राज्यात जसे लिंगपिसाट आहेत तसे सत्तापिसाटही आहेत. लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट खोक्यांवर उभे राहून सरन्यायाधीशांशी हास्यविनोद करतात. कायद्याची भीती राहिलेली नाही व न्यायदेवता खोकेबाजांची बटीक बनली आहे. महाराष्ट्रातील एकूणच माहोल विद्यमान सत्ताकाळात बिघडला आहे. जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीसांच्या खुर्चीखाली वात पेटवली आहे. जनता त्रस्त आहे. जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून विचलित करण्यासाठी बदलापूरच्या आरोपीस गोळय़ा घातल्या, पण गृहमंत्र्यांचे संरक्षण असलेले सूत्रधार आपटे, कोतवाल, आठवले मात्र मोकळेच राहिले!