सामना अग्रलेख – फडणवीस आता ‘क्लिप्स’ काढणार! विकृती व लायकी

क्लिप्सकरणे लोकांना ब्लॅकमेल करणे हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचे राजकारण टिकून आहे. अनिल देशमुखांनी अशा क्लिप्सच्या राजकारणालाच आव्हान दिले आहे. एवढेच नव्हे तर, फडणवीसांवर आपण जे आरोप केले आहेत ते सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे व्हिडीओ रेकॉर्डिंग आहेत. कोणी आपल्याला आव्हान दिले तर आपण ते सर्व उघड करू, असा गंभीर इशाराही देशमुख यांनी दिला आहे. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या त्यांनी काढाव्याच. एकदा महाराष्ट्राला भाजपची विकृती लायकी कळायलाच हवी!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात सरळ सरळ फसविण्यात आले व यातून सुटका करून घ्यायची असेल तर आम्ही सांगतो त्या प्रतिज्ञापत्रांवर मुकाटपणे सह्या करा, असे देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तेव्हाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब, अजित पवार अशांची नावे खोट्या प्रकरणांत घ्या व स्वतःची सुटका करून घ्या, अशा प्रकारचा एक प्रस्ताव देशमुखांसमोर ठेवण्यात आला. देशमुख यांनी तो झिडकारला व तुरुंगात जाणे पसंत केले. फडणवीस वगैरे लोकांच्या दबावाला ते बळी पडले नाहीत. ‘‘फडणवीस यांनी हे जे उपद्व्याप केले, त्याचे ‘पेन ड्राईव्ह’ पुरावे आपल्याकडे आहेत. ते आपण बाहेर काढू,’’ असे देशमुखांनी जाहीर करताच फडणवीस यांनी ‘‘आमच्याकडेही देशमुखांच्या काही क्लिप्स आहेत, त्या बाहेर काढू. मग बघा!’’ असा दम भरला. म्हणजे फडणवीस यांनी भाजपच्या खऱ्या संस्कृतीचे दर्शन घडवलेच. विरोधकांचे फोन चोरून ऐकणे, फोन रेकॉर्ड करणे, व्हिडीओ क्लिप करण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरणे व पुढे त्या माध्यमातून आपल्या राजकीय विरोधकांना ब्लॅकमेल करणे हा अलीकडचा मूळ धंदा झालाच आहे. अशा क्लिपचा वापर करून मोदी-शहा-फडणवीस यांनी पक्षांतर्गत विरोधकांना गप्प केले. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. अनिल देशमुख यांच्यामागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावण्याचे सूत्रधार हे फक्त फडणवीसच असू शकतात. ठाकरे सरकार पाडून

खुर्चीवर चढण्याची

त्यांना अशी घाई झाली की, त्यासाठी तेव्हा कोणत्याही थराला जायची तयारी होती. ‘‘मुख्यमंत्री ठाकरे व इतर तिघांविरुद्ध आम्ही सांगतो ते आरोप करा, तशा प्रतिज्ञापत्रांवर सही करा. मग आम्ही हे सरकार पाडतो व तुमची अटक टाळतो,’’ असा हा सौदा होता. त्यासाठी आधी शंभर कोटींच्या वसुलीचे बनावट प्रकरण उभे केले गेले. त्या प्रकरणाची चौकशी ईडीकडे सोपवली व देशमुखांना अटक केली. याच काळात अंबानी यांच्या घराजवळ फुसका बॉम्ब ठेवण्याचे प्रकरण घडवले. दोन्ही प्रकरणे एकात एक गुंतविण्यात आली, पण या दोन्ही गुन्ह्यांचे खरे सूत्रधार तेव्हाचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग होते, पण परमबीर सिंग यांच्याकडून देशमुखांविरोधात आरोप करून घेतले व त्या बदल्यात परमबीर यांना अभय दिले. शंभर कोटींचे वसुली प्रकरण बनावट होते, पण ऑण्टिलियासमोर बॉम्ब ठेवून खळबळ माजवण्याच्या प्रकरणात पोलीस आयुक्त व त्यांची खंडणीखोर टोळी सहभागी होती. पोलीस आयुक्तांच्या दालनात कट रचला. त्या कटात एका निरपराध व्यक्तीचा खून झाला. हा खून करण्याचा व खून दडपण्याचा कट पोलीस आयुक्तांच्या दालनात रचला गेला. तरीही स्वतः पोलीस आयुक्त यांना दिल्लीने वाचवले व देशमुख यांना पकडले. या प्रकरणातला आणखी एक पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनाही मिंधे सरकारने तुरुंगातून बाहेर काढले. हे सर्व पाहिले की, कायदा, न्याय व्यवस्थेचा या मंडळींनी कसा

सर्रास गैरवापर

केला हे लक्षात येते. राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी त्या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना फडणवीस यांच्यासाठी किमान विसेक राजकीय विरोधकांचे फोन ‘चोरून’ ऐकले व या भयंकर गुन्हय़ाची चौकशी ठाकरे सरकारच्या काळात सुरू झाली. शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, पण भाजपने आमदारांना विकत घेऊन महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर सत्तेत आलेल्या मिंधे-फडणवीस यांनी गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये करणाऱ्या श्रीमती शुक्ला यांना सरळ राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले. विरोधकांच्या ऑडिओ क्लिप्स तयार करून फडणवीस यांना पुरवण्याचे काम तेव्हा रश्मी शुक्ला यांच्यासारखे अधिकारी करीत होते. त्यामुळे ‘क्लिप्स’ वगैरे प्रकरणात फडणवीस यांना भलताच रस आहे. त्यांनी भाजपअंतर्गत अनेकांच्या क्लिप्स तयार करून त्यांना संपवले. संघाचे नेते संजय जोशी यांच्या बनावट वादग्रस्त क्लिप्स कोणी केल्या व प्रसारित केल्या हे जगाला माहीत आहे. ‘क्लिप्स’ करणे व लोकांना ब्लॅकमेल करणे हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचे राजकारण टिकून आहे. अनिल देशमुखांनी अशा क्लिप्सच्या राजकारणालाच आव्हान दिले आहे. एवढेच नव्हे तर फडणवीसांवर आपण जे आरोप केले आहेत ते सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे व्हिडीओ रेकॉर्डिंग आहेत. कोणी आपल्याला आव्हान दिले तर आपण ते सर्व उघड करू, असा गंभीर इशाराही देशमुख यांनी दिला आहे. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या त्यांनी काढाव्याच. एकदा महाराष्ट्राला भाजपची विकृती व लायकी कळायलाच हवी!