लेन्सआय – नवलाईचे जग

>> ऋता कळमणकर

पक्षी जगत हे समृद्ध रंग, सौंदर्य आणि श्रवणीय आवाजाने भुरळ पाडणारे नवलाईचे जग आहे. जगभरात त्यांच्या जवळ जवळ नऊ हजार वेगवेगळ्या जाती आढळतात. यातील 1200 आपल्या देशात आढळतात. या अतिविशाल सुंदर समुदायाला 40 विभागांत विभागले गेले आहे. या जगात दहा पैशांच्या वजनाचे हमिंग बर्ड ते 135 किलोचा शहामृग अशी विविधता आढळते. शरीर हवेत उडण्यासाठी योग्य पद्धतीने विकसित झालेले व चोचीची आणि पायाची रचना त्याच्या खाण्याच्या सवयीनुसार असलेली. म्हणजे शिकारी पक्षी…तीक्ष्ण धारदार चोच, मांस व हाडे फोडण्यासाठी योग्य. फ्लेमिंगो, स्पूनबिल यांच्या चोची चिखल गाळून खाणे खाण्यासाठी योग्य. सूत्राची चोच लाकूड तोडण्यासाठी, तर पोपटाची धान्य फोडण्यासाठी योग्य. जशी चोचीत विविधता तशी पायातही. पळणे, फांदी पकडणे, पाण्यात चालणे अशी विविध कामांसाठी योग्य रचना. उत्तम दृष्टी, उत्कृष्ट श्रवणशक्ती, कमी प्रकाशात भक्ष्य पकडण्याची हातोटी, अशा जिवांचे हे अनोखे जगत. जमीन, झाडे, पाणी व दलदल अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. हिमालय पर्वतावर समुद्रसपाटीपासून सहा हजार मी. उंचीपर्यंतही ते आढळतात.

चिल्का सरोवर, भरतपूर, जामनगर, भिगवण अशा हिंदुस्थानातील पक्षी थांबे हिवाळ्यात पाहुण्यांनी गजबजून जातात. हिवाळा हा आपल्याकडे पक्षी निरीक्षणाचा मौसम आहे. कारण हिवाळ्याच्या सुरुवातीला आपल्याकडे कितीतरी पक्ष्यांचे थवेच्या थवे दाखल होतात. पक्षी हे विविध प्रकारे स्थलांतर करतात. उदा. पूर्वपश्चिम स्थलांतर, उत्तर-दक्षिण स्थलांतर, ध्रुवीय स्थलांतर, अल्टिटय़ूड स्थलांतर म्हणजे पर्वतीय स्थलांतर, सागरी स्थलांतर असे कितीतरी प्रकारे पक्षी स्थलांतर करतात. मुळात पक्षी स्थलांतर का करतात? हा प्रश्न आपल्याला पडतो. स्थलांतराची अनेक कारणे असतात. हिवाळ्यामध्ये उत्तर गोलार्धातील दिवस छोटा होतो. कडाक्याची थंडी पडू लागते. पक्ष्यांच्या अन्नाचा तुटवडा पडतो. त्यांना ऊबदार वातावरण आवडते. मग ते हवेत झेपावतात व मुबलक अन्न आणि सूर्यप्रकाशाच्या प्रदेशात दाखल होतात. मार्चपर्यंत पाहुणचार घेऊन मायदेशी परतात.

पक्षी जीवनात स्थलांतर ही महत्त्वाची घडामोड तसेच विणीचा हंगामही महत्त्वाचा. विणीच्या काळात पक्ष्याच्या शरीरात अंतर्बाह्य बदल होऊ लागतात. कमळ पक्ष्याला लांब शेपटय़ा दिसू लागतात. एग्रीटच्या पंखांना सोनेरी झळाळी दिसते. कोकीळ मधुर गाऊ लागतो. मोर पिसारा फुलवून नाचतो, पाणकोंबडा कंद तोंडात धरून मादीकडे आणतो. सारस मानेच्या लयबद्ध हालचाली करतो. जणू मादीच्या मनात भरण्यासाठी चढाओढच लागते. एकदा का जोडी जमली की, घरटे बांधणीचे काम सुरू होते. प्रणयी पाखरे मग आईबाप होण्याच्या तयारीला लागतात.

मोहक गडद निळा आणि चमकदार फिक्या निळ्या रंगाने बघणाऱयाचे लक्ष वेधून घेणारा आकर्षक पक्षी म्हणजे नीलकंठ, नीलपंख, ब्लूर, तास, चास किंवा इंडियन रोलर या नावाने ओळखला जातो, गावाबाहेर तारेवर हमखास दिसतो. आपलं लक्ष वेधून घेतात ते सूर्यपक्षी, रंगबेरंगी बी इटर, हिरवेगार पोपट, शुभ्र बगळे, पिवळाधमक हळद्या, ठिपक्यांची मुनिया…सर्व रंगबेरंगी पक्ष्यांचे हे रंग त्यांना कसे प्राप्त होतात? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. पक्षी हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे असे म्हणतात. तर हे पक्षी शरीरात मेलॅनिन हे पिगमेंट स्वत तयार करतात. परंतु निळे, पिवळे, तांबडे रंग त्यांना त्यांच्या खाण्यात येणाऱया फळे, बेरी, बियांमध्ये असणाऱया कॅरोटेनॉइड पिगमेंटमुळे प्राप्त होतात. जेव्हा जोडीदार निवडण्याची वेळ येते तेव्हा मादी जास्त तेजस्वी व गडद रंगाचा नर निवडते. कारण त्यांचे गडद रंग हे त्यांच्या चांगल्या आरोग्याचे प्रतीक असते. त्यातल्या त्यात उष्ण कटिबंधातील पक्षी जास्त रंगीत आढळतात.

[email protected]