
पुण्यातील नागरीक शांतीलाल सुरतवाला यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमधून शांतीलाल सुरतवाला यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत संताप व्यक्त केला आहे. जरा डोळे उघडे ठेवा. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळून स्कूटरवाल्यांना सुद्धा लूटण्याचा प्रोग्राम बनवतात, असे टोला सुरतवाला यांनी लगावला आहे.
केंद्र सरकारने जुन्या वाहनांच्या नंबरप्लेट बदलण्याचे निर्देश दिले आहेत. आणि महाराष्ट्र सरकारने नंबरप्लेट बदलण्यासाठीचे दर जाहीर केले आहेत. दुचाकीसाठी गोव्याला 155 रुपये द्यावे लागताहेत तर महाराष्ट्रात नव्या नंबरप्लेटसाठी 450 रुपये मोजावे लागत आहेत. रिक्षासाठी गोव्याला 155 रुपयांत नवी नंबरप्लेट मिळणार आहे. पण महाराष्ट्रात रिक्षा चालकांना 500 रुपये मोजावे लागत आहेत. कारच्या नंबरप्लेटसाठी गोव्यात 203 रुपये घेतले जात आहेत. महाराष्ट्रात 745 रुपये मोजावे लागत आहेत. यासंदर्भात एका मराठी वृत्तपत्रात दरासहीत बातमी आली आहे, असे सुरतवाला म्हणाले.
‘प्रयागराजला आंघोळ करून आला म्हणून मत देऊ नका’
आता मला एक सांगा गोव्याला मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आणि महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. गोव्याच्या सरकारडून 155 रुपयांत नंबरप्लेट मिळते. आणि ठेकेदाराकडून महाराष्ट्र सरकार 745 रुपयांत नंबरप्लेट दिली जातेय, वरच्या पैशांचं काय? कोण खाणार हे पैसे? गोव्याला नंबरप्लेट जो बनवून देतो त्याला टेंडर द्या ना. श्रीमंत असो की गरीब, महाराष्ट्र सरकार सगळ्यांचीच लुटालूट करतंय. आपले पैसे लूटताहेत. जरा डोळे उघडे ठेवा. माझी हात जोडून नम्र विनंती आहे. कुठलाही नेता, प्रयागराजला आंघोळ करून आला म्हणून मत देऊ नका. एकनाथ शिंदे सुद्धा आंघोळ करून आले. इथे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळून स्कूटरवाल्यांना सुद्धा लूटण्याचा प्रोग्राम बनवतात. थोडे जागे व्हा. आणि याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांना कळवा, असे आवाहन शांतीलाल सुरतवाला यांनी केले आहे.