लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने भाजपची धूळधाण उडवली. भाजपला बहुमताचा आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा बदलली असून ‘एनडीए’ सरकार असे बोलत फिरत आहेत. आता भाजपची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता मोठे विधान केले आहे.
लोकसभेत काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि संघावर जोरदार हल्लाबोल केला होता. संघ आणि भाजप संपूर्ण हिंदू समाज नाही असे राहुल गांधी म्हणाले होते. भारत जोडो यात्रेतही राहुल गांधी म्हणाले होते की द्वेषाच्या या बाजारात आम्ही प्रेमाचं दुकान मांडतोय. आता राष्ट्रीय स्वयंकसेवक संघाकडून काँग्रेसबाबत मोठे विधान आले आहे. संघाचे वरिष्ठ नेते आणि संघात दुसऱ्या क्रमांकाचे नेते समजले जाणारे दत्तात्रय होसबळे म्हणाले की आमचे आणि काँग्रेसचे कुठलेही वैर नाही. आम्ही संघाचे लोक समाजाच्या प्रत्येक व्यक्तींना भेटतो. आम्ही वर्षभर इतर पक्षाच्या नेत्यानांही भेटतो असेही होसबळे म्हणाले.
राहुल गांधींना भेटण्याची संघाची इच्छा
होसबळे म्हणाले की जिथे शाखा नसते तिथे हिंदू समाजाचे लोक एकत्र येतात. आपसांत बंधुभाव आणि हिंदू संस्कृती शिकवण्याचे काम करतात. राहुल गांधींबद्दल बोलताना होसबळे म्हणाले की, समाजात कुठलाच द्वेष नकोय. तुम्ही द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान चालवू पाहता, पण तुम्हाला आम्हाला भेटण्याची इच्छा नाही. आम्हाला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. संघाचे लोक सगळ्यांना भेटतात असेही होसबळे म्हणाले.
संघाच्या कार्यालयात जाणार नाही – राहुल गांधी
भाजप नेते वरुण गांधी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये सामील होतील अशी चर्चा होती. राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते की त्यांनी संघाची विचारसरणी मान्य केली आहे. पण माझा गळा कापला तरी चालेल पम मी संघाच्या कार्यालयात जाणार नाही असे राहुल गांधी म्हणाले होते.