अचानक RSS ने BJP वर हल्लाबोल का केला? खरं कारण आलं समोर!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( RSS ) सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपची कानउघाडणी केली. त्यानंतर आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायजरमधूनही भाजपचे कान टोचण्यात आले. आता आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनीही भाजपला अंहकार झाल्याचे सांगत फटकारले आहे. भाजप आणि आरएसएसमध्ये रंगलेल्या या कलगीतुऱ्याने विरोधी पक्षांना आयतेच कोलीत मिळाले आहे. आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मोठा दावा केला आहे.

भाजप आणि आरएसएसमध्ये सुरू असलेली वादावादी म्हणजे लक्ष भरकटवण्याचा प्रकार आहे. खरं म्हणजे दोन्ही संघटना एकच आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आपले नाक कापण्यापासून वाचवण्यासाठी आरएसएस भाजपवर हल्ला चढवत आहे. पण आधी आरएसएसचे लोक भाजपला जिंकवून संविधान बदलण्याच्या प्रयत्नात होते, असे मंत्री भारद्वाज म्हणाले.

आरएसएने स्वतःबद्दल एक मोठा गैरसमज करून ठेवला आहे. आपण एक अशी शक्ती आहोत, जी सर्वपक्षांना ज्ञान देऊ शकते, असे आरएसएसला वाटते. निवडणुकीपूर्वी ते भाजपबद्दल का बोलले नाहीत. कारण त्यावेळी त्यांना भाजपला जिंकवून देऊन संविधान बदलायचे होते. पण निवडणुकीत पराभव झाल्याने आता आरएसएसचा अजेंडा उघड झाला आहे, असा टोला भारद्वाज यांनी लगावला.

आरएसएस आपलं नाक कापण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असून भाजपवर हल्ला करत आहे. पण आरएसएस आणि भाजप एकच आहेत. ते लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना मूर्खात काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची प्रामाणिक इच्छा असती तर आज प्रभूश्रीराम त्यांच्यासोबत असते. हे वक्तव्य आरएसएसने निवडणुकीपूर्वी केले असते तर, सर्वांचे डोळे उघडले असते. आता हे सर्व ढोंग सुरू आहे, अशी टीका सौरभ भारद्वाज यांनी केली.