
एक शेतकरी गुलाबाची शेती करून महिन्याला 50 हजार रुपये कमावतोय. हरयाणात राहणारे राजेश कुमार हे दिव्यांग आहेत. त्यांना व्यवस्थित दिसत नाही. दहावी शिकलेले राजेश कुमार गावातच एका फॅक्ट्रीत वॉचमन म्हणून काम करायचे. त्यांना महिन्याला पाच हजार रुपये पगार मिळायचा. या पाच हजारात कुमार आणि त्यांचे कुटुंबीय कसाबसा महिना काढायचे. त्यांच्या ओळखीतल्या एका बागकाम करणाऱ्या व्यक्तीने त्यांना गुलाबाची शेती करायला सुचवलं.
कुमार यांची घरची एक एकरहू कमी शेती होती. यात ते गहू पिकवायचे, त्यातून त्यांना काहीच कमाई होत नव्हती. तेव्हा कुमार यांनी या शेतात गुलाबाची रोपं लावली. या रोपांना फुलं आली तेव्हा ही फुलं त्यांनी बाजारात विकली आणि महिन्याला ९ हजार रुपये मिळवले. कुमार यांची आर्थिक स्थिती सुधारली. पण गुलाबाचं फुल हे नाशवंत आहे. ती वेळीच विकली नाही तर ती खराब होतात आणि आर्थिक नुकसान होतं. म्हणून कुमार यांनी गुलाबापासून गुलकं, गुलाब पाणी, सरबत, केसांचे तेल आणि साबण बनवायला सुरूवात केली. याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन त्यांनी या उत्पादनांचा ब्रॅण्ड बनवला. आज गुलाबाच्या उत्पादनांपासून कुमार महिन्याला 50 हजार रुपये कमावतात.