सध्या सन मराठीवर ‘सावली होईन सुखाची’ ही मालिका लोकप्रिय होत आहे. त्या मालिकेत रुद्र पैठणकर ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे रोनक शिंदे… एक प्रॉमिसिंग चेहरा.
रोनकला अभिनयाची आवड ही लहानपणापासून होती. शारदाश्रम शाळेमध्ये त्याचे शिक्षण झाले. शाळेमध्ये नाटकाची स्पर्धा असो, गीता गायन स्पर्धा असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, रोनकचा सहभाग कायम असायचा. शाळेच्या क्रिकेट टीममध्येसुद्धा तो होता. तो म्हणतो, दादरच्या अमर हिंद मंडळातदेखील मी नाटकातून सहभागी व्हायचो. राज्य नाटय़ स्पर्धेतदेखील मी भाग घेतला होता. कीर्ती कॉलेजच्या नाटय़ विभागातर्फे अनेक एकांकिकांतून मी सहभाग घेतला व बक्षिसे मिळवली. आमची ‘एकुट समूह’ ही एकांकिका सवाईच्या अंतिम फेरीत होती. हळूहळू भविष्यात अभिनय क्षेत्रात करीअर करावे असे वाटू लागले होते.
रोनकने सह्याद्री वाहिनीवरील काही मालिका केल्या. तसेच ‘यदाकदाचित’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘ऑल दी बेस्ट 2’, ‘प्लॅनचेट’ या व्यावसायिक नाटकांत भूमिका केल्या. विविध ठिकाणी त्याचे ऑडिशन देणे सुरू होते आणि मग ‘फ्रेशर्स’ या झी युवा वाहिनीवरील मालिकेत त्याला महत्त्वाची भूमिका मिळाली. कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील त्याची भूमिका लक्षात राहिली. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत रोनकने अली आदिलशहा ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारली. ‘लक्ष्य’, ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकांतदेखील काम केले. सन मराठी वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ ही मालिका रोनकच्या दृष्टीने टार्ंनग पॉइंट ठरली. तो म्हणतो, मी या मालिकेत रुद्र ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. या भूमिकेला अनेक पंगोरे आहेत. या मालिकेला नाशिकची पार्श्वभूमी आहे. रुद्र हा महत्त्वाकांक्षी आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई घर सोडून जाते आणि त्यानंतर त्याचा सांभाळ त्याची काकी म्हणजे नंदाई करते. सुरुवातीला थोडासा एकलकोंडा असणारा हा रुद्र आता हळूहळू आपल्या मनातील भावना व्यक्त करायला लागला आहे. अशा प्रकारे एकाच वेळी अनेक शेड्स या भूमिकेतून साकारता येतात. माझ्या स्वभावाच्या पूर्णपणे भिन्न अशी ही व्यक्तिरेखा असल्यामुळे मला ही भूमिका साकारताना खूप छान वाटते. रंगभूमी आणि मालिका ही दोन्ही माध्यमे त्याच्या आवडीची. तो सांगतो, एकांकिका आणि नाटक यांनी मला घडवले आहे. नाटकात काम करताना प्रेक्षकांची लगेच मिळणारी दाद मला आनंद देते, तर मालिकेमुळे आपला चेहरा हा रोज घराघरात पोहोचतो. या आगामी वर्षात वेब सीरिज आणि चित्रपटातदेखील मला काम करायची इच्छा आहे.
गणेश आचवल