आता भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार यांचे लागले पोस्टर्स; अजित पवार यांची प्रतिक्रिया

राज्यात अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत. या नेत्यांच्या यादीत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचाही समावेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स लागले आहेत. त्यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. मॅजिक फिगर 145 हा आकडा असतो. तो गाठल्याशिवाय कुणी मुख्यमंत्री होत नाही. केवळ मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न राहते. अजित पवार पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली.

आमदार रोहित पवार यांचे पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील उर्से टोलनाका या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले आहेत. यावर अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायचे कोणीच शिल्लक राहणार नाही, सर्वजण आपापले फ्लेक्स लावत आहेत. माझे फ्लेक्स लागले तेव्हा कार्यकर्त्यांना सांगितल होते की असे फ्लेक्स लावून काही उपयोग होत नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळते. कुणी कोणाचे फ्लेक्स लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ज्यांच्याकडे मॅजिक फिगर 145 चा आकडा आहे तोच मुख्यमंत्री होतो अन्यथा केवळ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न राहते.

मराठा आरक्षण हे महत्त्वाचे आहे. आधीच्या सरकारनेदेखील मराठा आरक्षणाविषयी प्रयत्न केले. परंतु, ते हायकोर्टात टिकले नाही, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. त्यांचे मराठा आरक्षण हायकोर्टात टिकले. परंतु, ते सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यामुळे आता कायद्याच्या चौकटीत राहून आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणासंबंधी हे सरकार सकारात्मक असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाविषयीदेखील अजित पवार यांनी भाष्य करत याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. तो समाजदेखील महत्त्वाचा घटक आहे. यासंबंधी आम्ही बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले.