निवडणूक आयोग एक ब्र शब्दही उच्चारत नाही, याचा अर्थ काय? रोहित पवार यांचा जळजळीत सवाल

राज्यातील विधानसभा निवडणुकीवर राज्याचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनी चिंता व्यक्त केली. पण निवडणूक आयोग यावर एक ब्र शब्दही उच्चारत नाही याचा अर्थ काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, राज्याचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी मतदानाच्या टक्केवारीवर चिंता व्यक्त केलीय. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतदानाची टक्केवारी 55 टक्के असताना दुसऱ्या दिवशी ही टक्केवारी तब्बल 67  टक्क्यांवर गेल्याचे दाखवण्यात आले. मतदानाचं हे प्रमाण गेल्या तीन दशकातील सर्वोच्च होतं, असं त्यांचं मत आहे. मतदानाची ही अवास्तव वाढलेली टक्केवारी आणि बोगस मतदानात झालेली वाढ या सर्व गोष्टी चिंताजनक आहेत. म्हणूनच मतदारांच्या मनात याबाबत अनेक शंका आहेत आणि आम्ही सातत्याने याबाबत प्रश्न विचारतोय. मात्र निवडणूक आयोग यावर एक ब्र शब्दही उच्चारत नाही, याचा अर्थ काय? असा सवालही रोहित पवार यांनी विचारला.