भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे अण्णा हजारे आता आंदोलन करणार नाही. त्यामुळे त्यांनी आता विश्रांती घ्यावी. बाबा आढावांसारखे खरे सामजिक कार्यकर्ते परिश्रम करत आहेत, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अण्णा हजारेंचा समाचार घेतला.
राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी सरकारच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. यावरून रोहित पवार यांनी अण्णा हजारेंना टोला लगावला आहे. अण्णा हजारे आता आजारी असतील. तसेच भाजपची सत्ता आल्याने ते आता काही आंदोलन करणार नाहीत. भाजपची सत्ता नसते तेव्हा ते आंदोलन करत असतात. आता त्यांची तब्बेतही डाऊन असेल आणि सत्ता भाजपची आली आहे. त्यामुळे त्यांना आता खूप काही कष्ट करावे लागणार नाहीत. त्यामुळे आता त्यांनी विश्रांती घ्यावी, काळजी घ्यावी. या वयामध्ये खूप परिश्रम करणे पण योग्य नाही, असा सल्ला वजा टोला रोहित पवार यांनी अण्णा हजारेंना लगावला आहे.