बोपन्ना-सुत्जियादी जोडी उपांत्य फेरीत

हिंदुस्थानचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्ना व त्याची इंडोनेशियाची साथीदार अल्डिला सुत्जियादी अमेरिका ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक दिली. त्यांनी चुरशीच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डेन व झेक प्रजासत्ताकची बारबोरा क्रेजसिकोवा या जोडीचा पराभव केला.

बोपन्ना-सुत्जियादी या आठव्या मानांकित जोडीने एब्डेन-क्रेजसिकोवा या चौथ्या मानांकित जोडीचा 7-6(7/4), 2-6, 10-7 असा पराभव करीत आगेकूच केली. ही लढत एक तास 33 मिनिटांपर्यंत रंगली. आता उपांत्य लढतीत बोपन्ना-सुत्जियादी जोडीपुढे डोनाल्ड यंग व टेलर टाउनसेंड या यजमान अमेरिकन जोडीचे आव्हान असेल. 44 वर्षीय बोपन्ना याआधी पुरुष दुहेरीत तिसऱया फेरीत पराभूत झालाय. मात्र, मिश्र दुहेरीत सुवर्णपदकापासून तो केवळ दोन पावले दूर आहे.

स्विटेक, सिनरची आगेकूच

पोलंडची इगा स्विटेक व इटलीचा यानिक सिनर या अनुक्रमे महिला व पुरुष गटातील अक्वल मानांकित खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत अमेरिका ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. पाच वेळची ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन स्विटेकने रशियाच्या ल्यूडमिला सॅमसोनोवा हिचा 6-4, 6-1 असा सरळ सेटमध्ये धुक्वा उडवत आगेकूच केली. आता स्विटेकची गाठ सहाव्या मानांकित जेसिका पेगुला हिच्याशी पडेल.  पुरुष एकेरीत यानिक सिनरने यजमान अमेरिकेच्या टॉमी पॉलचे कडवे आव्हान 7-6(7/3), 7-6(7/5), 6-1 असे मोडीत काढले. पहिले दोन्ही सेट टायब्रेकपर्यंत ताणल्याने सिनरचा चांगलाच घामटा निघाला. मात्र, तिसऱया सेटमध्ये आक्रमक खेळ करीत विजय मिळवला.